चेन्नई: तमिळनाडूमध्ये 'गज' चक्रीवादळाने कहर केला असून या प्रकोपात 20 जणांचा बळी गेल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री सहायता निधीतून मृतकांच्या परिवाराला प्रत्येकी 10 लाख रुपये मदत म्हणून देण्याची घोषणा सरकारने केली आहे.


बंगालच्या उपसागरातील ‘गज’ चक्रीवादळ शुक्रवारी रात्री उशिरा तमिळनाडूमधील नागपट्टणमजवळ किनाऱ्याला धडकलं. ताशी 90 ते 100 किलोमीटरच्या वेगाने वाहणारे वारे आणि तुफान पाऊस या भागात सुरु झाल्याने हाहाकार माजला.

हवामान विभागाच्या माहितीनुसार हे चक्रीवादळ नागपट्टणम आणि वेदारनियममधून पश्चिम आणि दक्षिण किनाऱ्यांवरून पुढे सरकत आहे. आतापर्यंत या वादळाच्या तडाख्याने 20 लोकांचा मृत्यू झाला असून मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले आहे.

ज्या परिसरात हे चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे, अशा सर्व परिसरांमध्ये शुक्रवारी शाळा-महाविद्यालये बंद ठेवली होती. राज्य सरकारच्या माहितीनुसार 81,000 लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

चक्रीवादळाचा तडाखा बसणाऱ्या जिल्ह्यामध्ये तमिळनाडू सरकारने हाय अलर्ट जारी केला आहे. दोन एक तासांत या चक्रीवादळात अनेक झाडे जमीनदोस्त झाले आहेत. तर तुफान पावसामुळे किनाऱ्याजवळच्या भागात काहीशी पडझड झाली आहे. दरम्यान, नौदलाची हेलिकॉप्टर्सही या मदत कार्यात सहभागी झाले आहेत.

नागपट्टनमा, कुड्डलोर, तिरुवरुर आणि रामनाथपुरम यांसह सात जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक संस्थांना सुट्टी देण्यात आली आहे. तर अनेक कार्यालयांतील कर्मचाऱ्यांना लवकर घरी पाठवण्याची सोय करण्यात आली होती.

या कामात किनारपट्टी भागत दोन नौदलाची दोन जहाजे आयएनएस रणवीर आणि खंजर बचाव कार्यासाठी तैनात करण्यात आली आहेत.