चेन्नई : बंगालच्या उपसागरातील ‘गज’ चक्रीवादळ गुरुवारी रात्री उशिरा तमिळनाडूमधील नागपट्टणमजवळ किनाऱ्याला धडकलं. ताशी 80 ते 90 किलोमीटरच्या वेगाने वाहणारे वारे आणि तुफान पाऊस या भागात सुरु झाला आहे.

दरम्यान, किनारपट्टी भागातील 76 हजार 290 लोकांना आतापर्यंत सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची माहिती तामिळनाडू सरकारच्या वतीने देण्यात आली.

चक्रीवादळाचा तडाखा बसणाऱ्या जिल्ह्यामध्ये तमिळनाडू सरकारने हाय अलर्ट जारी केला आहे. तसेच प्रशासनाने घेतलेल्या चोख खबरदारीमुळे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये कोणतीही यात जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

दोन एक तासांत या चक्रीवादळात अनेक झाडे जमीनदोस्त झाले आहेत. तर तुफान पावसामुळे किनाऱ्याजवळच्या भागात काहीशी पडझड झाली आहे. दरम्यान, नौदलाची हेलिकॉप्टर्सही या मदत कार्यात सहभागी झाले आहेत.

नागपट्टनमा, कुड्डलोर, तिरुवरुर आणि रामनाथपुरम यांसह सात जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक संस्थांना सुट्टी देण्यात आली आहे. तर काही ऑफिसेसमधील कर्मचार्यांना लवकर घरी पाठवण्याची सोय करण्यात आली होती.

या कामात किनारपट्टी भागत दोन नौदलाची दोन जहाजे आयएनएस रणवीर आणि खंजर बचाव कार्यासाठी तैनात करण्यात आली आहे. त्याचबरोबर तामिळनाडूतील किनारी भागात पावसाने तुफान बरसण्यास सुरुवात केली आहे.