Gaganyaan Mission: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आज गगनयान (ISRO Gaganyaan) मोहिमेचं पहिलं चाचणी उड्डाण प्रक्षेपित करणार नाही. इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ (S. Somanath) यांनी सांगितलं की, आज प्रक्षेपित होणारी मोहीम खराब हवामानामुळे स्थगित करण्यात आली आहे. लवकरच या चाचणीचं पुन्हा प्रक्षेपण केलं जाईल. 


चांद्रयान-सूर्ययाननंतर इस्रो (ISRO) आता गगनयान प्रक्षेपण करून इतिहास रचणार आहे. आज ISRO श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून गगनयानचं क्रू मॉड्युल लॉन्च केलं जाणार होतं. मात्र, खराब हवामान आणि काही तांत्रिक अडचणींमुळे आजचं लॉन्चिंग रद्द करण्यात आलं असून पुढे ढकलण्यात आलं आहे. 


इस्रोकडून केल्या जाणाऱ्या चाचणी मोहिमेला टेस्ट व्हेईकल अॅबॉर्ट मिशन-1  (Test Vehicle Abort Mission -1) असं नाव देण्यात आलं आहे. याशिवाय, त्याला टेस्ट व्हेईकल डेव्हलपमेंट फ्लायंट (TV-D1) असंही म्हटलं जात आहे. आता जेव्हा चाचणी मोहीम लॉन्च केली जाईल, तेव्हा टेस्ट व्हेईकल आपल्यासोबत अंतराळवीरांसाठी तयार केलेलं क्रू मॉड्यूल घेऊन जाईल. क्रू मॉड्युल घेऊन रॉकेट साडेसोळा किलोमीटरवर जाईल आणि नंतर बंगालच्या उपसागरात उतरेल. 






इस्रोच्या चाचणी उड्डाणाचं यश गगनयान मोहिमेच्या पुढील सर्व नियोजनाची रूपरेषा निश्चित करेल. यानंतर, पुढील वर्षी आणखी एक चाचणी उड्डाण होणार आहे, ज्यामध्ये ह्युमनॉइड रोबोट व्योमित्र पाठवलं जाईल. अबॉर्ट मिशन म्हणजे, काही समस्या असल्यास, अंतराळवीरासह हे मॉड्यूल त्यांना सुरक्षितपणे खाली आणू शकतं का? याची चाचणी घेतली जाईल. 


क्रू मॉड्यूल, क्रू रेस्क्यू सिस्टमच्या सुरक्षा मानकांचा अभ्यास करणं, हा चाचणी मोहिमेचा उद्देश : इस्रो 


इस्रोनं सांगितलं की, "क्रू मॉड्यूल' (जे अंतराळवीरांना घेऊन जाईल) आणि क्रू रेस्क्यू सिस्टीमसह सुसज्ज सिंगल-स्टेज लिक्विड प्रोपल्शन रॉकेट अंतराळ केंद्राच्या पहिल्या प्रक्षेपण पॅडवरून प्रक्षेपित केलं जाईल. चाचणी वाहन मोहिमेचं उद्दिष्ट अखेरीस प्रक्षेपित करण्याचं आहे. गगनयान मोहिमेअंतर्गत भारतीय अंतराळवीर यानाला पृथ्वीवर परत आणण्यासाठी क्रू मॉड्यूल आणि क्रू रेस्क्यू सिस्टमच्या सुरक्षा मानकांचा अभ्यास करणं हा यामागचा उद्देश आहे."


क्रू एस्केप सिस्टम टेस्टिंग म्हणजे नेमकं काय?


सोप्या भाषेत समजून घ्यायचं झालं तर, मोहिमेदरम्यान काही चूक झाली, तर भारतीय अवकाशातील अंतराळवीरांना सुरक्षितपणे पृथ्वीवर कसं आणलं जाईल? त्याची चाचणी आज होणार आहे. भारतीय अंतराळ संस्था इस्रो गगनयान मोहिमेच्या क्रू एस्केप सिस्टमची चाचणी घेणार आहे. यासाठी पहिली मोठी चाचणी होणार आहे. या चाचणीमध्ये रॉकेटमध्ये काही बिघाड झाल्यास अंतराळवीरांना सुरक्षितपणे पृथ्वीवर आणणाऱ्या यंत्रणेची चाचणी घेतली जाणार आहे. यामध्ये श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमधून टेस्ट व्हेईकल अॅबॉर्ट मिशन टीव्ही-डी1 लाँच करण्यात येणार आहे. या फ्लाईटचे तीन भाग असतील - सिंगल स्टेज लिक्विड रॉकेट, क्रू मॉड्यूल आणि क्रू एस्केप सिस्टम.