नवी दिल्ली : जी-20 परिषदेसाठी (G20 Summit) ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) हे भारतात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शनिवार 9 सप्टेंबर रोजी ऋषी सुनक यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक देखील केली. या बैठकीदरम्यान व्यावसायिक संबंध मजबूत करण्यासाठी आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याच्या मार्गांवर चर्चा करण्यात आली असल्याचं सांगण्यात येत आहे. पंतप्रधान ऋषी सुनक हे जी-20 परिषदेसाठी शुक्रवारी (8 सप्टेंबर) रोजी भारतात आले. परिषदेच्या बैठकीच्या पहिल्या सत्रानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये बैठक पार पडली.
पंतप्रधान मोदींनी काय म्हटलं?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, दिल्लीमध्ये जी-20 परिषदेदरम्यान पंतप्रधान ऋषी सुनक यांना भेटून खूप आनंद झाला. आम्ही व्यावसायिक संबंध मजबूत करण्याच्या आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याच्या मार्गांवर चर्चा केली. पुढे बोलतांना त्यांनी म्हटलं की, भारत आणि ब्रिटन हे दोन्ही देश जगामध्ये समृद्ध काम करण्याच्या दृष्टीने पावलं उचलतील.
जपानच्या पंतप्रधानांसोबतही द्विपक्षीय बैठक
जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यासोबत देखील द्विपक्षीय बैठकही पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. आम्ही भारत आणि जपान द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला. तसेच जी-20 परिषदेच्या आणि जपानच्या जी-7 परिषदेच्या कार्यकाळाचा देखील आढावा यावेळी आम्ही घेतला. कनेक्टिव्हिटी, वाणिज्य आणि इतर क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
भारतात 9 आणि 10 सप्टेंबर रोजी जी-20 परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या परिषदेसाठी अनेक देशांचे प्रमुख नेते भारतात दाखल झाले आहेत. दरम्यान शुक्रवारी (8 सप्टेंबर) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक केली.