चंदिगढ : येत्या दिवाळीपर्यंत पेट्रोल-डिझेलचे दर उतरतील, असं वक्तव्य केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलं आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीनं सर्व स्तरातून झालेल्या टीकेनंतर प्रधान यांनी ही माहिती दिली.
अमेरिकेत आलेल्या इरमा वादळामुळे कच्च्या तेलाचं उत्पादन 13 टक्क्यांनी घटलं. त्याचा परिणाम इंधनाच्या किंमतींवर झाल्याचं प्रधानांनी सांगितलं. तेल कंपन्यांचं मार्जिनही प्रमाणात असल्याचं त्यांनी सांगितलं.
पेट्रोल-डिझेल सध्या जीएसटीच्या कक्षेत नाही. मात्र ते जीएसटी अंतर्गत आल्यास ग्राहकांनाच त्याचा फायदा होईल, असंही धर्मेंद्र प्रधान म्हणाले.
15 ऑक्टोबरनंतर दिवाळी असल्यामुळे ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात पेट्रोल-डिझेलच्या किमती उतरण्याची आशा आहे. म्हणजे किमान महिनाभर तरी इंधनामुळे वाहनचालकांच्या खिशाला चाट बसणार आहे.
दररोज इंधनाचे दर बदलते ठेवण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयानंतर पेट्रोल-डिझेलच्या किमतीत मोठी वाढ पाहायला मिळाली. त्यामुळे विरोधकांसह सर्वसामान्य वाहनचालकांनी याविरोधात आवाज उठवला होता.