नवी दिल्ली : गेल्या वर्षीच्या कोरोना लाटेच्या तुलनेत या वर्षी आलेली कोरोनाची दुसरी लाट ही अत्यंत गंभीर असल्याचं समोर आलंय. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी हॉस्पिपटलमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोनाच्या गंभीर रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याचं समोर आलंय.
गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्याच्या दरम्यान देशात कोरोनाच्या रुग्णवाढीची संख्या सर्वाधिक होती. पण सध्याचा विचार करता, आता ज्या प्रमाणात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे,ती संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठी आहे.
देशात सध्या जवळपास 4.5 टक्के अॅक्टिव्ह रुग्ण संख्या ही ऑक्सिजनच्या सपोर्टवर आहे तर 2.3 टक्के रुग्ण हे अतिदक्षता विभागात आहेत. तसेच 0.4 टक्के रुग्ण हे व्हेन्टिलेटरवर आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी एका बैठकीत ही आकडेवारी सांगितल्याचं टाईम्स ऑफ इंडियाने म्हटलं आहे.
गेल्या वर्षीचा विचार करता, ऑगस्टमध्ये देशात 2.4 टक्के अॅक्टिव्ह रुग्ण हे ऑक्सिजनच्या सपोर्टवर होते तर 1.8 टक्के रुग्ण हे अतिदक्षता विभागात होते. तसेच केवळ 0.2 टक्के रुग्ण हे व्हेन्टिलेटरवर होते.
गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी रुग्ण संख्या वाढीचे प्रमाण जलद आहे. त्यामुळे या वर्षी हॉस्पिटल्समध्ये बेड्स उपलब्धता कमी असल्याचं दिसत आहे. गेल्या चार दिवसांपासून देशात दर दिवशी कोरोनाची रुग्णसंख्या लाखांत वाढत आहे. शुक्रवारी एकाच दिवशी देशात एक लाख 45 हजार इतक्या कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे.
देशात एकीकडे रुग्णसंख्या वाढत असताना दुसरीकडे कोरोनाच्या लसीच्या तुटवड्याच्या बातम्या येत आहेत. अनेक राज्यानी आपल्याला आवश्यक प्रमाणात कोरोनाच्या लसींचा पुरवठा झाला नाही अशी तक्रार केली आहे. शुक्रवारी एकूण 32,16,949 कोरोना लसीचे डोस देशभरात वितरित करण्यात आले आहेत असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितलंय. आतापर्यत 9 कोटी 80 लाख 75 हजार 160 कोरोनाचे डोस देण्यात आले आहेत असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची आकडेवारी सांगते.
महत्वाच्या बातम्या :