14 फेब्रुवारीपासून स्टेंट्सचे नवीन दर निश्चित केले जातील. अँजिओप्लास्टी शस्त्रक्रियांना सामोरं जाणाऱ्या लाखो हृदयविकाराच्या रुग्णांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या वर्षी म्हणजे 2016 मध्ये भारतात अंदाजे 6 लाख स्टेंट्सचा वापर अँजिओप्लास्टीमध्ये झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
ड्रग एल्युटिंग स्टेंटची किंमत सध्या 24 हजार ते दीड लाख रुपयांच्या घरात आहे. तर बायोरिसॉर्बेबल स्टेंटसाठी 1.7 लाख ते दोन लाख रुपयांच्या घरात किंमत आकारली जाते. भारतात वापरल्या जाणाऱ्या 95 टक्के स्टेंट्स या ड्रग एल्युटिंग प्रकारच्या असतात.
स्टेंटमध्ये नफेखोरी कशी होते?
स्थानिक कंपन्यांना स्टेंट बनवण्यासाठी अंदाजे आठ हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. मॅन्युफॅक्चररचं मार्जिन अत्यंत कमी असून वितरकांना 13 टक्क्यांपासून दोनशे टक्क्यांपर्यंत नफा होतो. रुग्णालयांकडून किमतीत 11 ते 654 टक्क्यांपर्यंत वाढ केली जाते. कारखानदारापासून रुग्णापर्यंत प्रत्यक्ष स्टेंट पोहचेपर्यंत किमतीत दसपट वाढ होते.
हृदयावरील शस्त्रक्रियेतील स्टेंटवर 270 ते 1000 टक्के नफा
स्थानिक मॅन्युफॅक्चररना स्टेंटसाठी आठ हजार रुपये खर्च येतो, तर परदेशातून आयात केलेल्या स्टेंटसाठी 5 हजार रुपये खर्च येतो. रुग्णालयांकडून स्टेंटवर सर्वाधिक म्हणजे 650 टक्क्यांपर्यंत मार्जिन मिळवलं जातं. एकूण नफा 270 टक्क्यांपासून एक हजार टक्क्यांपर्यंत असतो. त्यामुळे स्टेंट्सच्या दरनिश्चितीला रुग्णालयांकडून मोठा विरोध होताना पाहायला मिळाला.
रुग्णालयांकडूनच मोठ्या प्रमाणात नफेखोरी होत असली तरी सगळीच हॉस्पिटल्स इतकी मोठी रक्कम आकारत नाहीत. त्यामुळेच नफ्याची मर्यादा 11 टक्क्यांपासून 654 टक्क्यांपर्यंत आहे.