Free Ration Scheme : देशात सुरू असलेल्या मोफत रेशन योजनेची मुदत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi ) यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.  या बैठकीत मोफत रेशन योजना यावर्षी सप्टेंबरपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


मोफत रेशन योजना 31 मार्चला संपत होती. परंतु, त्याची मुदत आता सप्टेंबरपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे. या योजनेची मुदत वाढवण्याच्या निर्णयाबाबत पंतप्रधान मोदींनी ट्विट केले  आहे. " देशातील प्रत्येक नागरिकाच्या शक्तीत भारताचे सामर्थ्य आहे. ही शक्ती आणखी मजबूत करण्यासाठी सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना सहा महिन्यांनी वाढवली आहे. ही योजना सप्टेंबर 2022 पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशातील 80 कोटींहून अधिक लोकांना पूर्वीप्रमाणेच याचा लाभ घेता येईल." असे ट्विट पंतप्रधान मोदींनी केले आहे. 






दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोना महामारीच्या काळात सुरू करण्यात आलेल्या मोफत रेशन योजनेला तीन महिन्यांनी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मार्च 2022 पर्यंत असलेली ही योजना आता जूनपर्यंत सुरू राहणार आहे. यामध्ये 15 कोटी लोकांना मोफत रेशन देण्याची तरतूद आहे. या योजनेंतर्गत राज्यातील 15 कोटी जनतेला पुढील तीन महिने अन्नधान्य योजनेंतर्गत डाळ, मीठ, साखर याबरोबरच अन्नधान्य मिळणार आहे.


शुक्रवारी योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारची पहिली मंत्रिमंडळ बैठक आज सकाळी पार पडली. यात मोफत रेशन योजनेला तीन महिन्यांची मुदवाढ देण्यात आली. त्यानंतर आज पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही योजना आणखी सहा महिने पुढे वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  


महत्वाच्या बातम्या