नवी दिल्ली : दिवसेंदिवस देशामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. दुसरीकडे देशातील ओमायक्रॉन व्हेरियंटचा (Omicron Variant) संसर्गही वेगाने वाढत आहे. दिल्लीतही ओमायक्रॉन व्हेरियंटचे नवे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे दिल्ली सरकारची डोकेदुखी वाढली आहे. या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेत एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. कोरोना काळात गरिबांना मोफत रेशन मिळत होते. या योजनेचा कालावधी आणखी सहा महिने वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री केजरीवाल यांनी घेतला आहे. दिल्लीत आता 31 मे पर्यंत मोफत रेशन मिळणार आहे.


दिल्ली मंत्रीमंडळाची आज एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत रेशन मोफत देण्याचा कालावधी ६ महिने वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अरविंद केजरीवाल यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे गरिब लोकांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.  दिल्लीतील गरिब लोक आणखी ६ महिने या योजनेचा लाभ घेऊ शकतात. वाढत्या ओमायक्रॉनच्या प्रकरणांबाबत बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले, की याबाबत आमची तज्ञांशी बैठक झाली आहे. ओमायक्रॉनचा प्रसार वेगाने होत आहे. परंतू त्याची लक्षणे खूप सौम्य आहेत. जसे की ताप, डोकेदुखी आणि थकवा येतो. यामध्ये रुग्णालयात दाखल होण्याचे आणि मृत्यूचे प्रमाण देखील खूप कमी असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले.


दिल्लीकरांनी घाबरू नये


दिल्लीकरांनी कोणत्या प्रकारची भिती बाळगण्याची गरज नाही. जरी ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असले तरी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली आहे. सगळी व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे दिल्लीकरांनी घाबरुन जाण्याचे कारण नसल्याचे केजरीवाल म्हणाले. तुम्हाला हॉस्पिटल किंवा औषध हवी असतील तर दिल्ली सरकारने सर्व व्यवस्था केली आहे. आम्ही सर्व रुग्णालयामध्ये ऑक्सिजन आणि बेडची व्यवस्था केली आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची कमतरता भासणार नसल्याचे केजरीवाल यांनी सांगितले.


कोरोनाच्या नव्या व्हेरियंट ओमायक्रॉनने चिंता वाढवली आहे. ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे. देशातील ओमयाक्रॉनबाधित रुग्णांची संख्या शंभरीपलीकडे गेली आहे. सध्या देशातील ओमायक्रॉन बाधितांची संख्या 113 वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी माहिती दिली की, 11 राज्यात ओमायक्रॉन व्हेरियंटने शिरकाव केला आहे. मागील 20 दिवसांत देशातील दैनंदिन नव्या कोरोना रुग्णांची नोंद दहा हजारांपेक्षा कमी झाली  आहे. पण ओमायक्रॉनचं स्वरुप आणि इतर देशातील वाढत्या ओमायक्रॉन रुग्णाची संख्या पाहाता आपल्याला सतर्क राहण्याची गरज आहे.


महत्त्वाच्या बातम्या: