पणजी : गोव्यात परराज्यातील रुग्णांवर होणारे मोफत उपचार बंद करण्यात येणार आहेत. नववर्षापासून म्हणजेच 1 जानेवारी 2018 पासून नव्या नियमांची अंमलबजावणी सुरु करण्यात येईल, अशी माहिती गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली.


गोवा सरकारच्या निर्णयाचा मोठा फटका महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांना बसणार आहे. सिंधुदुर्गातून मोठया संख्येने रुग्ण गोव्यामध्ये उपचारासाठी जातात. सिंधुदुर्गातील रुग्णांना मुंबईऐवजी गोवा जास्त जवळ पडतं. सिंधुदुर्गाच्या तुलनेत गोव्यामध्ये आधुनिक उपचार सेवा उपलब्ध आहेत.

गोव्यामध्ये परराज्यातील रुग्णांवर शुल्क आकारण्यात येणार असल्याची चर्चा गेल्या दोन महिन्यांपासून होती. अखेर शुक्रवारी हा निर्णय घेण्यात आला.

हा निर्णय घेण्यासाठी गोवा सरकारने समिती स्थापन केली होती. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कर्नाटकातील कारवार भागातून मोठया आजारांवर उपचारासाठी रुग्ण गोव्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये येतात. सिंधुदुर्ग, रत्नागिरीतील रुग्णांवर जास्त भार पडू नये यासाठी महाराष्ट्रातील आरोग्यमंत्र्याशी चर्चा करु, असं विश्वजीत राणेंनी सांगितलं.