श्रीनगर : रमजान महिना संपताच जम्मू-काश्मीर खोऱ्यात भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन ऑलआऊट’ला पुन्हा सुरुवात केली होती. ‘ऑपरेशन ऑलआऊट’अंतर्गत भारतीय सैन्याने सोमवारी चार दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. त्यामुळे रमाजान महिन्यात पाकिस्तानने केलेल्या कुरापतींना चोख उत्तर देणार असल्याचे मनसुबे लष्काराने स्पष्ट केले आहेत.


बांदीपोरामधील पनारच्या जंगलात सोमवारी चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याची अधिकृत माहिती लष्कराने दिली. दहशतवाद्यांविरोधात सुरु असलेल्या ऑपरेशनदरम्यान लष्करप्रमुख बिपीन रावत स्वत: काश्मीर खोऱ्यात उपस्थित आहेत. बिपीन रावत यांनी शहीद औरंगजेबच्या कुटुंबीयांचीही यावेळी भेट घेतली.


दहशतवाद्यांकडून औरंगजेब यांची हत्या
रमजान ईदच्या एक दिवस आधी 44 राष्ट्रीय रायफल्सचे जवान औरंगाजेब यांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. ईदच्या सुट्टीसाठी घरी परतत असताना दहशतवाद्यांनी मुघल रोडवर त्यांचं अपहरण केलं होतं. औरंगजेब हे अँटी-टेरर ग्रुपचे सदस्य असल्यानेच त्यांची हत्या करण्यात आली होती.


'ऑपरेशन ऑलआऊट' पुन्हा सुरु
रमजान महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये लागू करण्यात आलेली शस्त्रसंधी केंद्रीय गृहमंत्रालयाने मागे घेतली आहे. केंद्र सरकारकडून ‘सस्पेंशन ऑफ ऑपरेशन’ या मिशनअंतर्गत 17 मे 2018 ला शस्त्रसंधी लागू करण्यात आली होती. याअंतर्गत दहशतवाद्यांविरोधात चालू असलेल्या ‘ऑपरेशन ऑलआऊट’ला स्थगिती देण्यात आली होती. ‘ऑपरेशन ऑलआऊट’थांबवल्याने दहशतवाद्यांनी त्याचा गैरफायदा घेत रमजानच्या पवित्र महिन्यात जवळपास ६६ हल्ले केले. या हल्ल्यात १४ भारतीय जवान शहीद झाले, तर ७ नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते.