गुवाहाटी/इम्फाळ : उत्तर भारतात आलेल्या महापुरात गेल्या 24 तासात 6 लोकांचा मृत्यू झाला आहे. महापुरात आतापर्यंत 23 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. पूरस्थिती हळूहळू कमी होत आहे, मात्र अद्यापही जनजीवन विस्कळीत झालेले आहे. आसाम आणि मणिपूर या राज्यांना महापुराचा फटका बसला आहे.
आसाममध्ये गेल्या 24 तासात 5 जणांचा मृत्यू झाला आहे, तर मणिपूरमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. एएसडीएमएने दिलेल्या माहितीनुसार, होजाई, कर्बी आंगलांग पूर्व, कर्बी आंगलांग पश्चिम, गोलाघाट, करीमगंज, हैलाकांडी आणि कछार या भागात 4.25 लाखांहून अधिक लोकांना पुराचा तडाखा बसला आहे. या पुराचा फटका 716 गावांना बसला आहे. यात 3,292 हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे.
ब्रम्हपुत्रा नदीने धोक्याची पातळी ओलांडली
ब्रम्हपुत्रा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. जोरहाटमधील निमातीघाट आणि कचारच्या एसी घाट परिसरात नदी पाण्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. धनसीरी आणि इतर नद्यांनीही धोक्याची पातळी ओलांडली आहे. मणिपूरच्या इम्फाळ खोऱ्यात परिसरात पुराचं पाणी ओसरताना दिसत आहे. मात्र लिलोंग नदीचा जलस्तरही वाढलेलाच आहे.
रेल्वे सेवेवरही परिणाम
उत्तरपूर्व सीमा रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी प्रणव ज्योती शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंदरखल दमचारा स्टेशन दरम्यान भूस्खलन झाले आहे. यामुळे लुमडिंग-बदरपूर खंड दरम्यान रेल्वेसेवा ठप्प आहे.