जम्मू-काश्मीर : काश्मीरच्या पुलवामा जिल्हातील लस्सीपोरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवादांमध्ये झालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. मात्र हे दहशतवादी लश्कर-ए-तोयबाचे असल्याचं समोर आलं आहे.
जम्मू काश्मीरच्या पुलवामातील लस्सीपोरा भागात सोमवारी पहाटे दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक झाली. या चकमकीत चार दहशतवाद्यांना सुरक्षा दलानं ठार केलं आहे. या दहशतवाद्यांकडून दोन एके रायफल, एक एसएलआर आणि एक पिस्तूल जप्त करण्यात आलं आहे. परिसरात अद्याप शोधमोहिम सुरु असून चकमकीनंतर संपूर्ण परिसर सील करण्यात आला होता.
या चकमकीत तीन जवान जखमी झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पुलवामा परिसर दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याचं दिसून येत आहे.
पुलवामा हल्ल्यात 40 जवान शहीद
पुलवामा येथे 14 फेब्रुवारीला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. दहशतवाद्यांकडून सीआरपीएफ जवानांच्या ताफ्याला निशाणा बनवण्यात आलं होतं. लष्करावर देशाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता. तब्बल 200 किलो स्फोटकांनी भरलेली कार दहशतवाद्यांनी जवानांच्या बसवर आदळली होती. त्यानंतर मोठा स्फोट झाला आणि त्यात बसचा अक्षरश: चुराडा झाला. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.