मुंबई : 1 एप्रिलपासून नवे आर्थिक वर्ष सुरु होत आहे. अर्थसंकल्पातील तरतुदी आणि जीएसटी परिषदेत घेतलेल्या निर्णयांची आज म्हणजे 1 एप्रिलपासून अंमलबजावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर काही गोष्टी स्वस्त होणार आहेत तर काही महागणार आहेत. सर्वसामान्यांसाठी दिलासादायक म्हणजे घरांच्या किंमती आता कमी होणार आहेत. तर गॅसच्या किंमती वाढणार आहेत.


काय स्वस्त, काय महाग?

- केंद्र सरकारने अंतरिम अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदीनुसार करमुक्त उत्पन्नाची मर्यादा आजपासून पाच लाख रुपये होणार आहे.

- जीएसटीच्या नव्या नियमानुसार निर्माणाधीन घरांचा कर 12 वरुन 5 टक्क्यांवर आला आहे. तर परवडणाऱ्या घरांचा कर 8 टक्क्यांवरुन 1 टक्का झाला आहे.

- एकाच व्यक्तीच्या नावावर असलेली दोन घरं आजपासून करमुक्त होणार आहेत. पूर्वी एखादा व्यक्ती दुसऱ्या घराच्या भाड्यावर पैसे कमवत असल्याचं समजून त्याच्याकडून कर वसूल केला जात होता.

- टीडीएसची मर्यादा वाढवून 40 हजार करण्यात आली आहे. बँकेत आणि पोस्टात पैसे गुंतवणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना याचा फायदा होणार आहे.

- ईपीएफओच्या नव्या नियमांनुसार नोकरी बदलल्यास पीएफ खातं आपोआप ट्रान्सफर होणार आहे.

- नॅशनल पेन्शन स्कीमला EEE म्हणजेच एग्जेंप्ट-एग्जेंप्ट-एग्जेंप्ट दर्जा मिळणार आहे. याचा अर्थ नॅशनल पेंशन स्कीममध्ये गुंतवलेले पैसे, त्यावर मिळणारं व्याज आणि मॅच्युरिटी पिरीयड पूर्ण झाल्यावर मिळणाऱ्या पैशावर कोणताही कर लागणार नाही.

- गॅसच्या किंमतीत आजपासून 10 टक्क्यांची वाढ होणार आहे. गेल्या तीन वर्षातली ही सर्वाधिक दरवाढ आहे. यामुळे सीएनजी आणि स्वयंपाक घरातील पाईप गॅसही महाग होणार आहे.

- टाटा आणि महिंद्राच्या गाड्यांच्या किंमतीतही 25 हजारांपर्यंत दरवाढ करण्यात आली आहे.

- रेल्वेत आजपासून संयुक्त पॅसेंजर नेम रेकॉर्ड म्हणजेच पीएमआर मिळणार आहे. ज्यानुसार एखादा प्रवासी एका मागोमाग दुसरा रेल्वे प्रवास करणार असेल तर एकच पीएनआर असणार आहे.

- देना बँक आणि विजया बँक आज बँक ऑफ बडोदामध्ये विलीन होणार आहेत. यामुळे बँक ऑफ बडोदा देशातली तिसरी सर्वात मोठी बँक होणार आहे.