नवी दिल्ली : केंद्र सरकारने पॅन कार्डला आधार नंबर लिंक करण्याच्या (जोडण्याच्या) मुदतीत वाढ केली आहे. केंद्रीय थेट कर मंडळाने (सीबीडीटी - सेंट्रल बोर्ड ऑफ डिरेक्ट टॅक्सेस) याबाबतची माहिती दिली आहे. पॅन कार्ड आधारला लिंक करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने 31 मार्च 2019 ही अंतिम तारीख दिली होती. परंतु यासाठी 30 सप्टेंबर 2019 पर्यंत मुदवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ज्या नागरिकांनी पॅन-आधार लिंक केलेले नाही. त्यांना अजून एक संधी मिळाली आहे.

पॅन आधार लिंकसाठी सहा महिन्यांची मुदतवाढ दिली असली तरी उद्यापासून (सोमवार, 1 एप्रिल) उत्पन्नाचा परतावा भरताना आधार नंबर देणे आणि लिंक करणे बंधनकारक असल्याचे सीबीडीटीने जाहीर केले आहे. पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करण्यासाठी मुदत वाढवून देण्याची ही सहावी वेळ आहे. जून 2018 मध्ये सीबीडीटीने 31 मार्च 2019 ही अंतिम तारीख जाहीर केली होती.


सीबीडीटीच्या नियमांनुसार आयकर भरताना आधार कार्ड क्रमांक देणे सक्तीचे करण्यात आले आहे. बनावट पॅन कार्डद्वारे होणारे गैरव्यवहार रोखण्यासाठी केंद्र सरकारने पॅन कार्ड आधार कार्डशी जोडणे बंधनकारक केले आहे.