नवी दिल्ली : दिल्ली-चंदिगढ राष्ट्रीय महामार्गावर दाट धुक्यामुळे सिंधू बॉर्डरजवळ कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार खेळाडूंचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर दोन राष्ट्रीय खेळाडू गंभीर जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे. हा अपघात इतका भीषण होता की, यात कारचा अक्षरश: चुराडा झाला.

पहाटे चारच्या सुमारास हा अपघात झाला. यात हरीश, टिंकू, सूरज आणि एका अज्ञाताचा मृत्यू झाला आहे. तर सक्षम यादव आणि बाली हे दोन राष्ट्रीय खेळाडू गंभीर जखमी झाले आहेत.


या अपघातातातील गंभीर जखमींपैकी सक्षम यादव हा खेळाडू वेट लिफ्टिंगमध्ये दोनवेळा वर्ल्ड चॅम्पियन राहिलेला आहे. तर दुसरा एक खेळाडू बाली यांची प्रकृती गंभीर असून, दोघांनाही सुरुवातीला नरेला मधील सत्यवादी राजा हरिश्चंद्र रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण दोघांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने, त्यांना शालीमार बाग परिसरातील मॅक्स रुग्णालयात हालवण्यात आलं.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. दाट धुक्यामुळे स्विफ्ट डिझायर कार महामार्गावरील डिव्हायडर आणि खांबाला धडकल्याने हा अपघात झाला. तर गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

हा अपघात इतका भीषण होता की, गाडी डिव्हायडरला धडकल्यानंतर तिचा अक्षरश: चुराडा झाला. तर चौघांचा जागीच मृत्यू झाला होता.