अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबादमध्ये चार मजली इमारत कोसळली आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दहा जणांपेक्षा अधिक जण अडकल्याची भीती व्यक्त केली जाते आहे.

अहमदाबाद शहरातील ओढव भागात ही दुर्घटना घडली आहे. दुर्घटनाग्रस्त इमारत सरकारी गृहरचना योजनेतून उभारण्यात येत होती. या इमारतीमध्ये एकूण 32 फ्लॅट होते.

या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत चार जणांना सुरक्षितरित्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलं आहे. अजूनही दहापेक्षा अधिक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे.

दुर्घटनास्थळी एनडीआरएफची पाच पथकं दाखल झाली असून, ढिगारा बाजूला सारुन आत आडकलेल्यांना वाचवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवानही घटनास्थळी दाखल झाले आहेत.