गुरुग्राम : हरियाणाच्या फोर्टिस रुग्णालयात डेंग्यू उपचारांसाठी 16 लाख रुपयांचं बिल भरुनही सात वर्षांच्या मुलीचा मृत्यूप्रकरणात नवं वळण आलं आहे. कायदेशीर कारवाई रोखण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने 25 लाखांची लाच दिल्याचा दावा मुलीचे वडील जयंत सिंह यांनी केला आहे.


फोर्टिस रुग्णालय आता हे प्रकरण दडपण्याचा आणि आपल्या चुका लपवण्याच्या प्रयत्नात असल्याचं दिसत आहे.

"फोर्टिस रुग्णालयाचे वरिष्ठ अधिकारी मला भेटले आणि 10 लाख 37 हजार 889 रुपयांचा चेक घेण्याची ऑफर दिली," असंही चिमुकलीच्या वडिलांनी सांगितलं.

इतकंच नाहीतर तर या अधिकाऱ्यांनी 25 लाख रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही जयंत सिंह यांनी केला आहे. हे पैसे घेतल्यानंतर कायदेशीर करार करण्यास त्यांनी सांगितलं. या प्रकरणातील कोणतीही गोष्ट सोशल मीडियावर जाहीर करायची नाही, तसंच हे प्रकरण कोर्टात घेऊन जायचं नाही, अशा अटी या करारात घातल्याचं जयंत सिंह म्हणाले.

https://twitter.com/ANI/status/938451012561416194
फोर्टिसविरोधात गुन्हा : अनिल विज
दरम्यान, गुरुग्रामच्या फोर्टिस रुग्णालयाविरोधात हरियाणा सरकार गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री अनिल विज यांनी दिली आहे. मुलीचा मृत्यू निष्काळजीपणाने झालेला नाही तर ही हत्या आहे. रुग्णालय प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल केला जाईल, असं अनिल विज म्हणाले.

महत्त्वाचं म्हणजे रुग्णालयाच्या ब्लड बँकचा परवानाही रद्द करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?
दिल्लीच्या द्वारकामध्ये राहणाऱ्या जयंत सिंह यांची सात वर्षांच मुलगी आद्याला 27 ऑगस्टपासून ताप होका. दुसऱ्याच दिवशी तिला रॉकलॅण्ड रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे दोन दिवस उपचार केल्यानंतर तिला गुरुग्रामच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

डॉक्टरांनी पुढील दहा दिवस मुलीला लाईफ सपोर्ट सिस्टम अर्थात व्हेंटिलेटरवर ठेवलं. पण 14 सप्टेंबर रोजी तिचा मृत्यू झाला. हद्द म्हणजे 15 दिवसांच्या उपचारांसाठी रुग्णालयाने मुलीच्या वडिलांकडे 16 लाखांचं बिल सोपवलं.

प्रकरण समोर कसं आलं?
यानंतर मुलीच्या वडिलांच्या एका मित्राने  @DopeFloat नावाच्या ट्विटर हॅण्डलवरुन 17 नोव्हेंबर रोजी रुग्णालयाच्या बिलची कॉपी पोस्ट करुन संपूर्ण घटना समोर आणली.
'माझ्या मित्राची सात वर्षांची मुलगी डेंग्यूच्या उपचारांसाठी 15 दिवस फोर्टिस रुग्णालयात होती. हॉस्पिटलने यासाठी त्यांना 16 लाखांचं बिल दिलं. यामध्ये 2700 हॅण्डग्लोव्ह्ज आणि 660 इंजेक्शनचाही समावेश होता. अखेर मुलीचा मृत्यू झाला.'
हे ट्वीट व्हायरल झालं आणि संपूर्ण प्रकरण समोर आलं. यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री जेपी नड्डा यांनी रुग्णालयाकडून अहवाल मागितला.

रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांना केला होता. रुग्णालयाविरोधात कठोर पावलं उचलण्याची मागणी मुलीच्या वडिलांनी केली आहे. हे प्रकरण अधिक तापल्यानंतर हरियाणाचे आरोग्य मंत्री अनिल विज आणि केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी चौकशीचे आदेश दिले होते.

डेंग्यूवर उपचार करताना चिमुकलीचा मृत्यू, बिल 16 लाख रुपये!
अशाप्रकारे 15 लाख 79 हजार रुपयांचं बिल
-अॅडमिशन चार्ज - 1250 रुपये,
ब्लड बँक - 61,315 रुपे,
डायग्नोस्टिक - 29,190 रुपये,
डॉक्टर चार्ज - 53,900 रुपये,
औषधं - 39,6732 रुपये,
इक्विपमेंट चार्ज - 71,000 रुपये,
इन्व्हेस्टिगेशन - 21,7594 रुपये,
मेडिकल/सर्टिकल प्रोसिजर - 28,5797 रुपये,
मेडिकल कन्ज्यूमेबल - 27,3394 रुपये,
मिसलेनियस - 15,150 रुपये,
रुम रेंट - 1,74,000 रुपये

कफनाचे 700 रुपयेही वसूल केले!
जोपर्यंत मी पैसे भरत होतो, तोपर्यंत रुग्णालयाची वर्तणूक चांगली होती. पण मुलीला घेऊन जाणार असल्याचं सांगितल्यानंतर त्यांचं वागणं बदललं. मुलीला घातलेल्या कपड्यांचे 900 रुपयेही रुग्णालयाने घेतले. इतकंच नाही तर कफनासाठीही 700 रुपये वसूल केले, असं जयंत सिंह यांनी सांगितलं.

रुग्णालयाचं स्पष्टीकरण
याप्रकरणी फोर्टिस रुग्णालयाने लेखी स्पष्टीकरण दिलं होतं. "सात वर्षांची मुलगी आद्याला दुसऱ्या खाजगी रुग्णालयातून 31 ऑगस्ट रोजी आणण्यात आलं. तिला डेंग्यू झाला होता, जो शॉक सिंड्रोमच्या स्तरावर होता. रुग्णालयाने उपचार सुरु केले, मात्र तिच्या पेशी कमी होत होत्या. मुलीवर उपचार करताना सर्व स्टँडर्ड प्रोटोकॉल आणि मार्गदर्शक तत्त्वांची काळजी घेण्यात आली. प्रकृती जास्त बिघडल्यानंतर मुलीला 48 तासांच्या आत व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. मुलीची प्रकृती खालावली होती आणि कुटुंबीयांना याची सर्व माहिती देण्यात आली होती. 14 सप्टेंबर रोजी डॉक्टरांचा सल्ला न ऐकता मुलीला घेऊन गेले आणि त्याच दिवशी तिचा मृत्यू झाला," असं स्पष्टीकरण रुग्णालयाने दिले होतं.

पाहा व्हिडीओ