नवी दिल्ली : देशात जीएसटी लागू करण्यासाठी मध्यरात्री पंतप्रधान मोदी संसदेच्या सभागृहात येतात. पण अधिवेशनात विरोधकांचा सामना करण्याचे धाडस पंतप्रधानांमध्ये नाही, असं म्हणत सोनिया गांधींनी मोदींवर हल्ला चढवला. काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीला संबोधित करताना सोनिया गांधीही मोदी सरकारचा चांगलाच समाचार घेतला.

सोनिया गांधी म्हणाल्या की, “ सध्या संसदेच्या परंपरेवर टीका केली जाते. पण संसदेच्या पटलावरुन जनेचे प्रश्न उपस्थित करण्याचे महत्त्वाचे व्यासपीठ आहे. पण सध्या संसदीय परंपरा आणि लोकशाहीची हत्या केली जात आहे. भ्रष्टाचारापासून ते डिफेंस डीलवरुन सरकारने उत्तरं दिली पाहिजेत. पण सरकार यापासून स्वत:चा बचाव करत आहे. त्यासाठीच हिवाळी अधिवेश लांबवलं जात आहे.”

त्या पुढे म्हणाल्या की, “सध्या देशातील वाढती बेरोजगारी, महागाई दर, निर्यात आणि जीएसटीसारखे अनेक मुद्दे आहेत. ज्याने लाखो नागरिकांचे आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. सरकारच्या निर्णयांचा लाभ काही मुठभर लोकांनाच मिळत आहे. पण पंतप्रधान मोदी आजही खोटी आश्वासनं आणि आकडेवारी सादर करण्यापेक्षा दुसरं काहीही करत नाही आहेत.”

विशेष म्हणजे, सोनिया गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर इतिहासाची मोडतोड केल्याचाही आरोप केला. त्या म्हणाल्या की. “देशाच्या इतिहासातील पंडित नेहरु आणि इंदिरा गांधींचं योगदान झाकोळ्यासाठी सुनियोजित पद्धतीने प्रयत्न सुरु आहेत. शालेय पाठ्यपुस्तकातून चुकीच्या पद्धतीने इतिहास शिकवला जात आहे.”

यावेळी सोनिया गांधींनी गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला चांगलं यश मिळेल, अशीही अपेक्षा व्यक्त केली.

त्या म्हणाल्या की, “गेल्या 18 महिन्यांपासून सुरु असलेल्या संघटनात्मक निवडणुकांमुळे काँग्रेस नेते ब्लॉक, प्रत्येक गावातील बूथ लेव्हलवरील लाखो कार्यकर्त्यांना भेटू शकले. यामुळे संपूर्ण देशात पक्षाची पाळंमुळं पुन्हा मजबूत झाली. गेल्या वर्षातील मे महिन्यापासून सुरु असलेली निवडणूक प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे.”

संबंधित बातम्या

गुजरात निवडणुकीआधीच राहुल गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदी?