मुंबई : किल्ले रायगडाला राजधानीचा दर्जा देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी संसदेत केली. अमोल कोल्हे यांनी आज संसदेत आपलं पहिलंच भाषण केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी 17 व्या शतकात किल्ले रायगडाची उभारणी केली.
जर, स्टॅच्यू ऑफ युनिटीचा विचार होत असेल, तर स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडचाही विचार केला पाहिजे. रायगड किल्ल्याची शासनाने जपणूक करुन राजधानी केल्यास, ते जगातील आठवे आश्चर्य ठरेल, असंही अमोल कोल्हे यांनी म्हटलं
छत्रपती शिवाजी महाराज लोकशाही निर्माण करणारे पहिले राजे होते. 17 व्या शतकात सगळीकडे साम्राज्यवाद सुरु असताना शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. रायगडसह अनेक किल्ले शिवाजी महाराजांनी बांधले. महाराजांनी या वास्तू स्वत:च्या नावे केल्या नाहीत किंवा कुटुंबातील व्यक्तींच्याही नावे केल्या नाहीत. शिवाजी महाराजांनी हे किल्ले रयतेची संपत्ती म्हणून जपले, आपणही या संपत्तीं संवर्धन केलं पाहिजे, असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं.
केंद्रात बहुमताचं सरकार आहे, त्यामुळे या सरकारने शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्याची 17 व्या शतकात होता तशी पुर्नबांधणी करावी. असं झाल्यास हे जगातील आठवं आश्चर्य असेल आणि हीच शिवाजी महाराजांना खरी आदरांजली असेल, असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं.