लखनऊ : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि आपले सहकारी कल्याण सिंह यांच्या निधनाने राम जन्मभूमी आंदोलनाचा चेहरा हरपला असल्याची भावना भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींनी व्यक्त केली. राम जन्मभूमीच्या आंदोलनावेळच्या त्यांच्या अनेक आठवणी आजही आपल्या मनात ताज्या असल्याचंही लालकृष्ण अडवाणी यांनी सांगितलं. 


उत्तर प्रदेशचे दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या कल्याण सिंह यांचं शनिवारी निधन झालं. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते.  कल्याण सिंह यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेकांनी शोक व्यक्त केला आहे.


कल्याण सिंह हे उत्तर भारतातील एक आक्रमक हिंदुत्ववादी चेहरा असलेले नेते म्हणून ओळखले जायचे.  त्यांनी राजस्थान आणि हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणूनही काम केलं होतं. 


कल्याण सिंह यांच्या जन्म 6 जानेवारी 1932 साली उत्तर प्रदेशातील अलिगड येथे झाला. देशात मंडल कमिशनचे वारे वाहत असताना भाजपने 'कमंडल'चा नारा दिला. त्यावेळी उच्चवर्णीय समाजाबरोबरच इतर जातीतील युवकांना भाजपकडे आकर्षित करण्यामध्ये कट्टर हिदुत्वाचा चेहरा असलेल्या कल्याण सिंह यांनी महत्वाची भूमिका बजावली. त्याचाच परिणाम म्हणून उत्तर प्रदेशमध्ये भाजप सत्तेत आलं आणि मुख्यमंत्री पदाची माळ कल्याण सिंह यांच्या गळ्यात पडली.


कल्याण सिंह यांनी पहिल्यांदा 1991 साली मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्याच काळात बाबरी विध्वंस झाला. त्यानंतर देशभरात हिंदू-मुस्लिम दंगल झाली. बाबरी विध्वंस प्रकरणी कल्याण सिंह यांचा हात असल्याचा त्यांच्यावर आरोप झाला. या प्रकरणी कल्याण सिंह यांनी 6 डिसेंबर 1992 रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष असला तरी भाजपला सत्तेपासून वंचित रहावं लागलं आणि कल्याण सिंह विरोधी पक्षनेते बनले. सप्टेंबर 1997 ते नोव्हेंबर 1999 या काळात दुसऱ्यांदा त्यांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली. 


कल्याण सिंह यांनी 1999 साली भाजपला सोडचिठ्ठी दिली. पण 2004 साली त्यांनी पुन्हा पक्षात परतण्याचा निर्णय घेतला. पक्षाने 2004 साली त्यांची राजस्थानच्या राज्यपाल पदी नियुक्ती केली तर 2005 साली त्यांची हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली होती. 


महत्वाच्या बातम्या :