नवी दिल्ली : पंजाब राज्याचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत आणि केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या निषेधार्थ पद्मविभूषण पुरस्कार परत केला. तसेच शिरोमणी अकाली दल (डेमोक्रेटिक) प्रमुख आणि राज्यसभेचे खासदार सुखदेवसिंग धिंदसा यांनी देखील कृषी कायद्याच्या निषेधार्थ पद्मभूषण परत करण्याची घोषणा केली आहे.


शिरोमणी अकाली दलाचे नेते प्रकाश सिंह बादल यांनी म्हटलं की, "मी जे काही ते जनतेमुळे आहे. विशेषत: सामान्य शेतकऱ्यांमुळे. आज जेव्हा त्यांचा सन्मान केला जात नाही, तेव्हा मला पद्मविभूषण पुरस्कार ठेवण्याचा अधिकार नाही. प्रकाश सिंह बादल यांच्याव्यतिरिक्त नुकताच पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार विजेता कुस्तीपटू करतार सिंह, अर्जुन पुरस्कार विजेता बास्केटबॉल खेळाडू सज्जनसिंग चिमा आणि अर्जुन पुरस्कार हॉकीपटू राजबीर कौर यांनी पुरस्कार परत देण्याची घोषणा केली.


आठवडाभरापासून हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर येऊन थांबले आहेत. केंद्र सरकारने नुकत्याच राबवलेल्या कृषी कायदे मागे घ्यावेत अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. यासंदर्भात शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात बैठकही झाल्या आहेत, मात्र अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही.


आपला सन्मान परत करतांना प्रकाशसिंग बादल यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहिले आहे. सुमारे तीन पानांच्या या पत्रात प्रकाशसिंग बादल यांनी केंद्र सरकारच्या कृषी कायद्यास विरोध दर्शवला आहे. यासह सरकारने शेतकऱ्यांवर केलेल्या कारवाईचा निषेधही केला आहे. तसेच पत्रातच त्यांनी आपला पद्मविभूषण पुरस्कार परत देण्याविषयी बोलले आहे.


संबंधित बातम्या