नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यावर करण्यात आलेली मेंदूची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. शस्त्रक्रिया करुन त्यांच्या मेंदूतील रक्ताची गुठळी दूर करण्यात आली आहे. सध्या प्रणव मुखर्जी यांना सैन्याच्या आर अँड आर हॉस्पिटलमध्ये व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आलं आहे. आजच प्रणव मुखर्जी यांची कोविड 19 टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. प्रणव मुखर्जी यांनी स्वत: ट्वीट करुन ही माहिती दिली होती.


प्रणव मुखर्जी यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहलं होतं की, इतर वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात गेलो होतो. त्यावेळी रुग्णालयात कोरोना चाचणीही करण्यात आली. यामध्ये कोरोना चाचणीचा अहवाल आला असून कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. गेल्या आठवड्यात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी विलीगीकरणात तसेच कोरोना चाचणी करावी, अशी विनंती देखील त्यांनी केली आहे.


Pranab Mukherjee | माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण





संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रुग्णालयात जाऊन प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. सुमारे 20 मिनिटे ते रुग्णालयातच होते. कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीपसिंग सुरजेवाला यांच्यासह अनेक पक्षाच्या सहकार्‍यांनी मुखर्जी लवकरच बरे होण्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.


कॉंग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्वीट केलं की, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी कोविड 19 या आजारातून लवकर बरे व्हावेत अशी आम्ही प्रार्थना करतो.


देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना गेल्या आठवड्यात भाजपच्या पाच मोठ्या नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा, तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, भाजपचे यूपी प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव आणि उत्तर प्रदेशचे जलशक्ती मंत्री महेंद्र सिंह यांचा समावेश आहे.