31 ऑक्टोबर 1984 रोजी नवी दिल्लीतील 1, सफदरजंग रोड, इथल्या निवासस्थानी अंगरक्षकांनीच इंदिरा गांधी यांची हत्या केली होती.
राहुल गांधींनी ट्विटरवर इंदिरा गांधी यांच्या आठवणींना उजाळा दिला. "आजीने मला खूप काही शिकवलं आणि माझ्यावर अतिशय प्रेम केलं. तिने जनतेसाठी बरंच काही केलं. मला तिचा अभिमान आहे," अशा शब्दात राहुल गांधींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
तर "आपल्या माजी पंतप्रधानं इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना श्रद्धांजली," असं ट्वीट पंतप्रधान मोदींनी केलं आहे.
अंगरक्षकांकडूनच हत्या
31 ऑक्टोबर 1984 रोजी इंदिरा गांधी यांच्या बेअंत सिंह आणि सतवंत सिंह या दोन अंगरक्षकांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यांच्या हत्येनंतर दिल्लीसह अनेक भागात हिंसाचार उफाळला होता. सुवर्ण मंदिरात केलेल्या ऑपरेशन ब्लू स्टारमुळे बेअंत सिंह आणि सतवंत सिंह नाराज होते, त्यामुळेच त्यांनी इंदिरा गांधी यांची हत्या केली.
एकमेव महिला पंतप्रधान
भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांची कन्या इंदिरा गांधी यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1917 रोजी झाला होता. त्या भारताच्या पहिल्या आणि आतापर्यंतच्या एकमेव महिला पंतप्रधान आहे. इंदिरा गांधी यांनी जानेवारी 1966 पासून मार्च 1977 पर्यंत त्यांनी पंतप्रधानपद भूषवलं. यानंतर 14 जानेवारी 1980 पासून 31 ऑक्टोबर 1984 या हत्येच्या दिवसापर्यंत त्या पंतप्रधान होत्या.