नवी दिल्ली : काँग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपल्या ट्वीटर अकाउंटवरील बायोमधून काँग्रेसच्या पदाचा उल्लेख हटवला आहे. त्यामुळं ज्योतिरादित्य हे काँग्रेसपासून दूर जात असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. मात्र, या चर्चा निराधार असल्याची प्रतिक्रीया ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली आहे.


"माझ्या ट्वीटर अकाउंटवरील बायोमध्ये बदल असून तो छोटा केला आहे, सध्या यासंदर्भात सुरू असलेल्या चर्चांना कुठलाही आधार नाही", असे ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितले आहे. दरम्यान, सध्या लोकसेवक आणि क्रिकेटप्रेमी, असा बायो ज्योतिरादित्य शिंदे यांनी केला आहे. काही महिन्यापूर्वी महाराष्ट्र व हरियाणा या दोन प्रमुख राज्यांमध्ये विधानसभेची रणधुमाळी सुरु असताना काँग्रेस नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु होते. त्याचदरम्यान, ज्योतिरादित्य शिंदे यांनी देखील काँग्रेसला आत्मपरिक्षणाची गरज असल्याचे म्हणत घरचा आहेर दिला होता. त्यामुळं काँग्रेसमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे समोर आले होते. तर, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला आलेल्या अपयशानंतर ज्योतिरादित्य शिंदे पक्षातील अंतर्गत मुद्यांवरून नाराज असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. शिवाय, राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे यांनी देखील सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला होता.


शिंदे गट नाराज
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीपासूनच काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी असल्याचे दिसत आहे. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी ज्योतिरादित्य यांची निवड व्हावी, अशी त्यांच्या समर्थकांची मागणी होती. मात्र, तोंडावर असलेल्या लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन काँग्रेस नेतृत्वानं तुलनेनं अनुभवी असलेल्या कमलनाथ यांना पसंती दिली. त्यानंतर ज्योतिरादित्य यांना किमान मध्य प्रदेशच्या काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा द्यावी, यासाठी त्यांच्या समर्थकांची मोर्चेबांधणी सुरू होती. मात्र, मुख्यमंत्री कमलनाथ व ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी त्यात खोडा घातला. या दोन्ही नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष पदासाठी काँग्रेसचे दिवंगत नेते अर्जुन सिंह यांचे चिरंजीव अजय सिंह यांचं नाव पुढं केलं आहे. त्यामुळं सिंधिया गट नाराज असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.

संबंधित बातम्या -

यूपीमध्ये फेल झालेले ज्योतिरादित्य शिंदे महाराष्ट्रात कमाल दाखवू शकणार?

कलम-370 हद्दपार, निर्णयाचं स्वागत करुन काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदेंचा काँग्रेसला घरचा आहेर

Sonia Gandhi | काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या घरी महत्त्वाची बैठक | ABP Majha