मंगलुरु : 'कॅफे कॉफी डे' चे मालक आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस एम कृष्णा यांचे जावई व्ही जी सिद्धार्थ अचानक बेपत्ता झाले आहेत. सोमवारी सिद्धार्थ मंगलुरु येथे येत होते, मात्र अचानक बेपत्ता झाले, अशी माहिती समोर येत आहे. सिद्धार्थ यांचा फोनही स्विच ऑफ आहे. दक्षिण कन्नड पोलीस सिद्धार्थ यांचा शोध घेत आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा आणि काँग्रेस नेते डी के शिवकुमार यांनी एस एम कृष्णा यांच्या बंगळुरु येथील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली.





सिद्धार्थ आपल्या गाडीने चिक्कमगलुरु येथे गेल होते. तेथून त्यांना केरळ येथे जायचे होते. मात्र मंगलुरुजवळ नेत्रावती नदीच्या पुलाजवळ त्यांनी आपली गाडी ड्रायव्हरला थांबवायला सांगितली आणि खाली उतरले. त्यावेळी सिद्धार्थ फोनवर कुणाशी तरी बोलत होते, अशी माहिती त्यांच्या ड्रायव्हरने दिली आहे.





ड्रायव्हरने सिद्धार्थ यांची जवळपास अर्धा तास वाट पाहिली, मात्र ते आले नाहीत. त्यानंतर ड्रायव्हरने त्यांना फोन केला तर त्यांचा फोन स्विच ऑफ येत होता. त्यांनंतर ड्रायव्हरने लगेचच सिद्धार्थ यांच्या कुटुंबियांना याबाबत माहिती दिली.





सिद्धार्थ जेपिना मोगारु येथून बेपत्ता झाले. हे ठिकाण नेत्रावती नदीच्या किनारी स्थित आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तसेच त्यांनी नदी आणि आसपासच्या परिसरात शोधमोहीम वेगाने सुरू केली आहे. सिद्धार्थ बेपत्ता होण्याआधी काही वेळ त्यांचा ड्रायव्हर त्यांच्यासोबत होता, त्यामुळे पोलीस त्याची चौकशी करत आहेत.





VIDEO | देशभरातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा | बातम्या सुपरफास्ट