Sharad Yadav : माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांचं निधन झालं आहे. 75 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शरद यादव यांच्या मुलीनं ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. पापा नहीं रहे, असं ट्वीट शरद यादव यांच्या मुलीनं केलं आहे. गुरुग्राम येथील फोर्टिंस रुग्णालयात शरद यादव यांनी अखेरचा श्वास घेतला.  


विद्यार्थी असताना राजकारणापासून सुरु झालेला शरद यादव यांचा प्रवास राष्ट्रीय राजकारणापर्यंत पोहचला. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये शरद यादव यांनी राजकीय प्रवास केला. जेडीयूचे ते राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेत. शरद यादव यांनी सात वेळा खासदार म्हणून काम पाहिलेय. 


 शरद यादव यांचा राजकीय प्रवास-
 
1. एक जुलै 1947 रोजी मध्य प्रदेशमधील होशंगाबाद येथील शेतकरी कुटुंबात जन्म
2. शिकत असतानाच राजकारणात रस... 1971 मध्ये इंजिनिअरिंग करताना जबलपुर इंजिनिअरिंग कॉलेज, जबलपुर मध्यप्रदेशमध्ये विद्यार्थी संघाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. शिक्षणातही ते अव्वल होते, बीईमध्ये (सिविल) ते गोल्ड मेडिलिस्ट होते. 
3. डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी अनेक आंदोलनात सहभाग नोंदवला होता.  MISA नुसार त्यांना 1969-70, 1972 आणि 1975 मध्ये पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. 
4. ओबीसी आरक्षणासाठी मंडल कमिशनच्या शिफारसी लागू करण्यात महत्वाची भूमिका.
5.  1974 मध्ये मध्य प्रदेशच्या जबलपूर लोकसभा मतदार संघातून खासदार म्हणून निवडून आले होते.  


6. 1977 मध्ये ते जनता दलाचे अध्यक्ष होते.  
7. 1986 मध्ये राज्यसभा खासदार म्हणून निवडून आले.  1989 मध्ये त्यांनी उत्तर प्रदेशच्या बदाऊं लोकसभा निवडनूक जिंकून तिसऱ्यांदा संसदेत पोहचले.


8. 1989-90 मध्ये टेक्सटाइल आणि फूड प्रोसेसिंग मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री म्हणून काम पाहिलेय.  
9. 1991 ते 2014 पर्यंत शरद यादव बिहारच्या मधेपुरा मतदार संघाचे खासदार होते.  
10. 1995 मध्ये त्यांना जनता दलाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवडले होते.  1996 मध्ये पाचव्यांदा ते खासदार झाले.  
11. 1997 मध्ये ते जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवडून आले.   
12. 13 ऑक्टोबर1999 मध्ये ते केंद्रीय मंत्री होते. त्यांच्याकडे नागरी उड्डाण मंत्रालयाचा कारभार होता. 2001 मध्ये केंद्रीय श्रम मंत्री म्हणून काम पाहिलेय. 
13. 2004 मध्ये ते दुसऱ्यांदा राज्यसभा खासदार म्हणून संसदेत गेले.  गृह मंत्रालयाशिवाय इतर अनेक कमिटींमध्ये ते सदस्य होते.  
14. 2009 मध्ये शरद यादव सातव्यांना खासदार म्हणून निवडून आले होते.  
15. 2014 लोकसभा निवडणुकीत शरद यादव यांना पराभवाचा सामना करावा लागला. 
16. त्यानंतर शरद यादव हे काही काळ जनता दल यूनाइटेडचे राष्ट्रीय अध्यक्ष ही होते.






 शरद यादव यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. यामध्ये सर्वसामान्यांपासून राजकीय नेत्यांचा समावेश आहे.