अहमदाबाद : गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. आधी भाजप मग काँग्रेस अशी वाटचाल केलेले शंकर सिंह वाघेला आता राष्ट्रवादी काँग्रेससोबत आपल्या नव्या राजकीय इनिंगला सुरुवात करणार आहेत. "अहमदाबादमध्ये शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत शंकरसिंह वाघेला पक्षात प्रवेश करतील," अशी माहिती गुजरात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पटेल उर्फ बोस्की यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत चर्चा केल्यावरच हा निर्णय घेतल्याचं वाघेला यांनी सांगितलं. तसंच मुंबईतून त्यांच्या औपचारिक पक्षप्रवेशाची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. "मी या मुद्द्यावर पवार साहेबांशी चर्चा केली. ही चांगली गोष्ट असल्याचं मला वाटतंय. सार्वजनिक आयुष्यात जनतेच्या मुद्द्यांना वाचा फोडण्यासाठी एका चांगल्या व्यासपीठाची गरज असते. कोणालाही अशा गोष्टींसाठी नाही म्हणता येणार नाही," असं शंकरसिंह वाघेला यांनी सांगितलं.
काँग्रेसला सोडचिठ्ठी
2017 च्या विधानसभा निवडणुकीआधी शंकरसिंह वाघेला यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. तर राज्यसभा निवडणुकीत वाघेला यांनी काँग्रेसच्या अहमद पटेल यांच्याविरोधात भाजपला मदत केली होती. आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ते आज अहमदाबादमधील कार्यक्रमात राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. गुजरातमध्ये लोकसभेच्या 26 जागा आहेत.
राजकीय कारकीर्द
शंकरसिंह वाघेला क्षत्रिय नेते आहेत. त्यांनी भाजपसोबत आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली होती. पण 1995 साली गुजरातमध्ये भाजप सत्तेत आल्यावर त्यांच्याऐवजी केशुभाई पटेल यांना मुख्यमंत्री बनवण्याच्या पक्षाच्या निर्णयानंतर त्यांनी भाजपला रामराम ठोकला. काँग्रेसचा बाहेरुन पाठिंबा घेत 1996 मध्ये ते गुजरातचे मुख्यमंत्री बनले.
मग ते काँग्रेसमध्ये सामील झाले आणि मनमोहन सिंह सरकारमध्ये त्यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं. काँग्रेसमध्ये असताना त्यांनी प्रदेशाध्यक्ष तसंच गुजरात विधानसभेत विरोधी पक्षनेता म्हणूनही काम केलं.
गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला राष्ट्रवादीत प्रवेश करणार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Jan 2019 08:18 AM (IST)
2017 च्या विधानसभा निवडणुकीआधी शंकरसिंह वाघेला यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. तर राज्यसभा निवडणुकीत वाघेला यांनी काँग्रेसच्या अहमद पटेल यांच्याविरोधात भाजपला मदत केली होती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -