Bharat Jodo Yatra : काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सध्या राजस्थानमध्ये (Rajasthan) सुरु आहे. या यात्रेत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन (Raghuram Rajan) सहभागी झाले आहेत. सवाई माधोपुर (Sawai Madhopur) येथील भदौती इथे रघुराम राजन हे राहुल गांधी यांच्यासोबत यात्रेत सहभागी झाले. यात्रेतील त्यांच्या सहभागानंतर विविध चर्चांना उधाण आले आहेत. 


रघुराम राजन हे राहुल गांधी यांच्याबरोबर यात्रेत सहभागी झाल्याचा फोटो काँग्रेसने सोशल मीडीयावर व्हायरल केला आहे.  द्वेषाच्या विरोधात देशाला एकत्र आणण्यासाठी लोकांची संख्या वाढत आहे. ही वाढती संख्या आपण यशस्वी होऊ हे दर्शवत असल्याचं काँग्रेसनं म्हटलं आहे. सध्या राहुल गांधा यांची भारत जोडो यात्रा ही राजस्थानमध्ये आली आहे. राजस्थानमधील भदौती इथे रघुराम राजन आज राहुल गांधी यांच्यासोबत यात्रेत सहभागी झाले होते. दरम्यान, काँग्रेसची ही पदयात्रा आज राजस्थानमधील बिलोना कलान मुक्कामी असणार आहे.






 


रघुराम राजन यांनी केंद्र सरकारच्या धोरणावर केली होती टीका


काही दिवसांपूर्वीच रघुराम राजन यांनी केंद्र सरकारच्या अनेक धोरणांवर टीका केली होती. सध्या अर्थव्यवस्थेची स्थिती चांगली नाही, परंतू तरीही सरकार सत्य स्वीकारण्यास तयार नाही आणि या प्रश्नाचे गांभीर्य सातत्याने कमी करत असल्याचे राजन म्हणाले होते. इतकेच नव्हे तर आर्थिक मंदीच्या समस्येवर मात करण्यासाठी मोदी सरकारला ही समस्या मान्य करावी लागेल कारण ती लपवून ठेवल्याने परिस्थिती सुधारणार नाही असेही ते म्हणाले होते. देशात मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या हिंसाचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर रघुराम राजन यांनी सावधगिरीचा इशाराही दिला होता. जगात भारताची प्रतिमा 'अल्पसंख्यांक विरोधी' बनली तर भारतीय कंपन्यांचं नुकसान होऊ शकतं. भारतीय उत्पादनांसाठी मार्केटमध्ये ही धोक्याची घंटा आहे. भारताची अशी प्रतिमा झाल्यानंतर विदेशी सरकारं आपल्या राष्ट्रावर विश्वास ठेवायला सहज तयार होणार नाहीत. अशामुळं गुंतवणूकदार आपल्याकडे गुंतवणुकीच्या दृष्टीनं पाहणं बंद करु शकतात, असंही रघुराम राजन यांनी म्हटलं आहे.




कोण आहेत रघुराम राजन?


रघुराम राजन हे रिझर्व्ह बँकेचे (RBI) 23 वे गव्हर्नर होते. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात 2013 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात 2016 पर्यंत रघुराम राजन भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. यानंतर उर्जित पटेल हे आरबीआयचे गव्हर्नर झाले. रघुराम राजन यांनी आयआयटी दिल्लीमधून बीटेक आणि आयआयएम अहमदाबादमधून व्यवस्थापन पदवी आणि एमआयटीमधून पीएच.डी. केली आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


देशाची प्रतिमा 'अल्पसंख्यांक विरोधी' बनली तर भारतीय कंपन्यांचं नुकसान; रघुराम राजन यांचा सावधगिरीचा इशारा