Satyendar Jain Injured : दिल्लीचे माजी आरोग्य मंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते सत्येंद्र जैन (Satyendar Jain) यांना आज (25 मे) पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रकृती अस्वास्थ्याच्या तक्रारीनंतर त्यांना पश्चिम दिल्लीतील दीनदयाल उपाध्याय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. चक्कर आल्याने ते तिहार तुरुंगातील (Tihar Jail) बाथरुममध्ये पडले होते. या दुर्घटनेत तो गंभीर जखमी झाले आहेत. याआधीही बाथरुममध्ये पडून सत्येंद्र जैन त्यांच्या पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाली होती. मागील आठवडाभरात सत्येंद्र जैन यांना दुसऱ्यांदा रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. सत्येंद्र जैन 31 मे 2022 पासून तुरुंगात आहेत. मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली त्यांची रवानगी तिहार तुरुंगात करण्यात आली आहे.


दीनदयाल उपाध्याय रुग्णालयात दाखल


दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन सध्या तिहार तुरुंग क्रमांक सातमध्ये आहेत. आज सकाळी सहा वाजता वैद्यकीय तपासणी कक्षाच्या बाथरुममध्ये असताना त्यांना चक्कर आली आणि पडले. या दुर्घटनेत त्यांना गंभीर दुखापत झाली. अशक्तपणाच्या तक्रारीनंतर त्यांना इथे निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं होतं. तिहारच्या डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली, ज्यामध्ये त्यांचे अवयव व्यवस्थित काम करत असल्याचे दिसून आले. मात्र जैन यांनी त्यांच्या पाठीत, डाव्या पायात आणि खांद्यामध्ये दुखत असल्याची तक्रार केली, त्यानंतर त्यांना उपचारांसाठी दीनदयाल उपाध्याय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. खबरदारी म्हणून त्यांच्या सर्व चाचण्या करण्यात आल्या आहेत.


सत्येंद्र जैन यांना मणक्याचा त्रास


दरम्यान माजी आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांच्या मणक्याचीही शस्त्रक्रिया होणार आहे. आठवडाभरात जैन यांना रुग्णालयात आणण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी 22 मे रोजी त्यांना दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यावेळी त्यांना त्यांना मणक्याचा त्रास होत होता. तर त्याआधी 20 मे रोजी देखील याच त्रासामुळे त्यांना दीनदयाल रुग्णालयात आणण्यात आलं होतं.


सत्येंद्र जैन यांचं 35 किलो वजन कमी झालं


सत्येंद्र जैन यांची प्रकृती चिंताजनक आहे. गेल्या वर्षभरात त्यांचे वजन 35 किलोने कमी झालं आहे. त्यांना मस्कुलर अॅट्रोफीचा त्रास आहे. या सर्व घटनांमुळे सत्येंद्र जैन हे प्रचंड नैराश्यात आहेत. यासंदर्भात त्यांनी तुरुंग प्रशासनाला पत्रही लिहिले होते. तुरुंगात राहून डिप्रेशनमध्ये गेल्याचं निदान झाल्यानंतर त्यांना औषधे आणि थेरपी देण्यात आली होती.


हेही वाचा


Satyendra Jain Video : तुरूंगात सत्येंद्र जैन यांचा ज्याने मसाज केला तो फिजिओथेरपिस्ट नव्हताच, नवा खुलासा; सुत्रांची माहिती