नवी दिल्ली : दिल्ली हायकोर्टाचे माजी मुख्य न्यायाधीश राजिंदर सच्चर यांचं वयाच्या 94 व्या वर्षी निधन झाले आहे. दिल्लीतील फोर्टीस रुग्णालयात गेल्या दोन आठवड्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

22 डिसेंबर 1923 रोजी राजिंदर सच्चर यांचा जन्म झाला. पंजाब राज्याचे दोनदा मुख्यमंत्री राहिलेले भीम सेन सच्चर हे राजिंदर सच्चर यांचे वडील. डीएव्ही हायस्कूल, लाहोरमधील गव्हर्नमेंट कॉलेज आणि लॉ कॉलेजमध्ये त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केले.

22 एप्रिल 1962 रोजी राजिंदर सच्चर यांनी शिमला कोर्टात वकिली करण्यास सुरुवात केली. 8 डिसेंबर 1960 रोजी त्यांची सुप्रिम कोर्टात वकील म्हणून नियुक्ती झाली. विधी व न्याय या क्षेत्रात त्यांनी आपले बहुमोल योगदान दिले.

6 ऑगस्ट 1985 ते 22 डिसेंबर 1985 या काळात ते दिल्ली हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश होते. विधिज्ञ म्हणून त्यांची कारकीर्द अत्यंत महत्त्वाची मानली जाते.

संयुक्त राष्ट्र संघात मानव अधिकारांच्या संरक्षणासंदर्भातील उपआयोगाचे ते सदस्य होते.

मार्च 2005 मध्ये राजिंदर सच्चर यांच्या नेतृत्त्वात तत्कालीन केंद्र सरकारने सच्चर समिती नियुक्त केली होती. या समितीने भारतातील मुस्लीम समाजाची आर्थिक, समाजिक आणि शैक्षणिक स्थितीचा अभ्यास करुन अहवाल सादर केला होता.