नवी दिल्ली : राफेल घोटाळ्यावरुन काँग्रेसने आणखी एक मोठा आरोप केला आहे. गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्याकडे राफेल घोटाळ्याची सर्व माहिती आणि कागदपत्रे असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. पर्रिकर यांच्या बेडरुममध्ये आणखी कोणती गुपितं दडली आहेत, असा सवाल काँग्रेसने विचारला आहे. तसंच देशाचा चौकीदार चोर असल्याचा पुनरुच्चारही काँग्रेसने केला आहे.

राफेलच्या मुद्द्यावर आज काँग्रेसने पत्रकार परिषद घेत गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या संभाषणाची ऑडिओ टेप जारी केली. यात गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे एका व्यक्तीशी बोलत आहे. "माझं कोणी काही करु शकत नाही कारण राफेलच्या सगळ्या फाईल माझ्याकडे आहेत," असं वक्तव्य मनोहर पर्रिकर यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केल्याचं विश्वजीत राणे ऑडिओ टेपमध्ये सांगत असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.


"नरेंद्र मोदी एकटे पॅरिसमध्ये गेले होते. त्यांच्या शिष्टमंडळात अनिल अंबानी होते. पण त्यावेळी आपले संरक्षण मंत्री गोव्यात मासे खरेदी करत होते. याची चौकशी व्हायलाच हवी. या घोटाळ्यामुळेच नरेंद्र मोदी संयुक्त संसदीय समितीची चौकशीपासूनही वाचण्याचा प्रयत्न करत आहेत. ते समितीलाही कागदपत्रे दाखवायला तयार नाहीत," असं काँग्रेसचे प्रवक्ते सुरजेवाला यांनी म्हटलं आहे.

"मनोहर पर्रिकरांकडे राफेल घोटाळ्याशी संबंधित मोठी माहिती आहे, ती समोर आलीच पाहिजे," अशी मागणीही रणदीप सुरजेवाला यांनी केली आहे.