पणजी : गोवा काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार शांताराम नाईक यांचं निधन झालं. हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यामुळे नाईक यांची प्राणज्योत मालवली. शांताराम नाईक 73 वर्षांचे होते.
गोव्यातील मडगावमध्ये शनिवारी पहाटे 6.30 वाजता नाईक यांचं निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी 11 वाजता कुंकळ्ळी येथील निवासस्थानी अंत्यसंस्कार होतील.
हार्ट अटॅक आल्यानंतर शांताराम नाईक यांना त्रिमूर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र तोपर्यंत त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता.
1967 मध्ये नाईक यांनी काँग्रेसमध्ये कार्यकर्ता म्हणून प्रवेश केल्यानंतर त्यांची राजकीय कारकीर्द सुरु झाली. 1984 मध्ये उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून ते लोकसभेवर खासदार राहिले होते. तर दोन वेळा त्यांनी राज्यसभेतून खासदारकी भूषवली आहे.