नवी दिल्ली : मणिपूरमध्ये तब्बल 16 वर्षे AFSPA कायद्याविरोधात उपोषण करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या इरोम शर्मिला आता काश्मीरवासियांची दु:खं जाणून घेणार आहेत. संजय नहार यांच्या पुण्यातील सरहद संस्थेसोबत त्या काश्मीरमधल्या महिलांसाठी काम करणार आहेत.


सरहदच्या या उपक्रमांतर्गत त्यांनी पहिल्यांदाच काश्मीरला भेट दिली. हा अनुभव आपल्यासाठी वैयक्तिक मोलाचा होता. काश्मीरवासियांची व्यथा जवळून पाहायची आपल्याला संधी मिळाली, अशी भावना इरोम शर्मिला यांनी यावेळी व्यक्त केली.

काश्मीरमधले लोक आता अहिंसेच्या मार्गाने लढण्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत, हे पाहून आपल्याला वेदना झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केली.



काश्मीरमध्ये 1989 मध्ये केवळ एक अनाथालय होतं, आता 40 आहेत आणि एकूण अनाथांची संख्या सव्वा लाखांच्या वर पोहोचली हे विदारक चित्र पाहून आपल्याला भरुन आलं, असंही इरोम शर्मिला यांनी म्हटलं.

चार दिवसांच्या या भेटीत त्यांनी काश्मीरमधल्या विविध संस्था, अनाथालयं, इस्लामिक विद्यापीठे यांना भेट देऊन काश्मीरमधल्या स्थितीचा आढावा घेतला. या दौऱ्यात काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती सईद यांच्याशीही त्यांची चर्चा झाली.

मणिपूर आणि काश्मीर या दोन्ही राज्यांमध्ये लष्कराविरोधात सामान्य जनतेचा असंतोष सारखाच आहे. त्यामुळे इरोम शर्मिला यांच्या कामाबद्दल काश्मीरवासियांना सहानुभूती आहे. इरोम शर्मिला पुढच्या काही महिन्यांत टप्प्याटप्याने काश्मीरमध्ये भेट देणार आहेत, असं सरहद संस्थेचे संजय नहार यांनी सांगितलं.