Ghulam Nabi Azad New Party : काँग्रेसला नुकताचा रामराम केलेले गुलाम नबी आझाद स्वतःचा पक्ष सुरू करण्याच्या तयारीत आहेत. त्याचे पहिले युनिट 14 दिवसांत जम्मू-काश्मीरमध्ये सुरू होईल. त्यांचे निकटवर्तीय जीएम सरोरी यांनी याबाबत माहिती दिली आहे.  गुलाम नबी आझाद यांनी शुक्रवारी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून काँग्रेसचा राजीनामा दिला होता. राजीनामा देताना त्यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावरही टीका केली होती. 


माजी मंत्री जीएम सरोरी हे देखील जम्मू आणि काश्मीर काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. ज्यांनी आदल्या दिवशी गुलाम नबी आझाद यांच्या समर्थनार्थ काँग्रेसचा राजीनामा दिला होता. त्यांचे नेते वैचारिकदृष्ट्या धर्मनिरपेक्ष राहिले असून भाजपच्या इशाऱ्यावर काम करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे ते म्हणाले. माजी मुख्यमंत्री आझाद यांनी काँग्रेस सोडल्यानंतर शेकडो ज्येष्ठ काँग्रेस नेते, पंचायती राज संस्थांचे सदस्य आणि प्रमुख कार्यकर्त्यांनी राजीनामा दिल्याचा दावाही त्यांनी केला. 


काँग्रेसच्या जम्मू आणि काश्मीर युनिटचे माजी उपाध्यक्ष सरोरी यांनी पीटीआयला सांगितले की, "आझाद आमच्या नवीन पक्षाच्या सुरूवातील त्यांच्या हितचिंतकांशी चर्चा करण्यासाठी 4 सप्टेंबर रोजी जम्मूला येत आहेत. शुक्रवारी राजीनामा दिल्यानंतर काही तासांनंतर, गुलाम नबी आझाद म्हणाले होते की ते लवकरच एक नवीन पक्ष सुरू करतील आणि त्याचे पहिले युनिट जम्मू-काश्मीरमध्ये स्थापन केले जाईल. 


आझाद म्हणाले होते की, "मला आत्ता राष्ट्रीय पक्ष सुरू करण्याची घाई नाही, पण जम्मू-काश्मीरमधील निवडणुकांची शक्यता लक्षात घेऊन मी तेथे लवकरच एक युनिट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे." जीएम सरोरी यांच्यासह अनेक माजी आमदारांनी शुक्रवारी नवी दिल्लीत गुलाम नबी आझाद यांची भेट घेतली आणि त्यांना पाठिंबा दिला. 


जीएम सरोरी म्हणाले, "आम्हाला आनंद होत आहे की ते जम्मू आणि काश्मीरमध्ये परत येत आहेत, जिथे त्यांनी मुख्यमंत्री म्हणून काम केले. लोक त्यांच्या राजवटीला सुवर्णकाळ म्हणून पाहतात. गुलाम नबी आझाद यांच्या जाण्याने जम्मू-काश्मीरमधील काँग्रेस जवळजवळ संपुष्टात आली आहे.


 नवीन पक्ष विकास, समाजातील सर्व घटकांमध्ये एकता यावर लक्ष केंद्रित करेल आणि 5 ऑगस्ट 2019 पूर्वीची परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी लढा देईल, असे सरोरी म्हणाले. 5 ऑगस्ट 2019 रोजी केंद्र सरकारने राज्यघटनेच्या कलम 370 अंतर्गत जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केला आणि राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केले.