पाटणा : बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांच्या चारा घोटाळ्यातील अपीलाची आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या चारा घोटाळ्यात लालू प्रसाद यादव यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. 90च्या दशकात झालेला हा चारा घोटाळा देशातील अनेक प्रमुख घोटाळ्यांपैकी एक आहे.

झारखंडमधील स्थानिक न्यायालयाने लालू प्रसाद यादव यांना शिक्षा सुनावल्यानंतर ते झारखंड उच्च न्यायालयात गेले. तिथे त्यांच्याविरुद्ध गुन्हेगारी स्वरुपाचे आणि कटकारस्थान केल्याचे आरोप काढून टाकण्यात आले. त्याला सीबीआयने उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. त्यावर झारखंड उच्च न्यायालयाने लालू प्रसाद यादव यांच्यावर भारतीय दंड विधानाच्या कलम 201 आणि कलम 511 नुसार कारवाई करण्याचे आदेश दिले.

कलम 201 हे खोटी माहिती देऊन दिशाभूल करण्यासाठी आणि पुरावे नष्ट करण्यासाठी आहे. हे दोन्ही आरोप त्यांच्यावर मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीत 96 लाख रुपयांच्या अनियमिततेप्रकरणी आहेत. 1990 ते 1997 या काळात चारा घोटाळ्यात तब्बल एक हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला होता.

झारखंड उच्च न्यायालयाने लालू प्रसाद यादव यांच्यावरील गुन्हेगारी स्वरुपाचं कटकारस्थान करण्याचे आरोप काढून टाकले असले, तरी कलम 201 आणि कलम 511 नुसार काही आरोप कायम ठेवले आहेत. त्यालाच यादव यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं असून त्यावर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे.