गोवा : महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गडचिरोलीसह गोव्यात देखील काही ठिकाणी पुराचा फटका बसला आहे. दक्षिण गोव्यातील धारबांदोडा तालुक्यातील कुळे गावातून वाहणाऱ्या खांडेपार नदीने आज रौद्ररूप धारण केले आहे. गावातील अनेक भागात पुराचे पाणी शिरले असून अनेक रस्ते, शेती पाण्याखाली गेल्याने बऱ्याच गावांचा संपर्क तुटला आहे. रविवारपासून खांडेपार नदी दुथडी भरून वाहत आहे. पावसाचा जोर कायम असून पाणी ओसरत नसल्याने कुळे परिसरातील अनेक शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.


महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील पाऊस आणि पुराचा फटका गोव्याला बसला आहे. पावसाचा जोर कायम असल्याने गोव्यात जीवनावश्यक वस्तूचा तुटवडा जाणवू लागला आहे. दूध, भाजीपाला, मासळी, मटण, अंडी इत्यादांची आयात बंद झाली आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढत आहेत. ताजे दूध नसल्याने टेट्रा पॅकमधील दूध विकले जात आहे.

तिलारी धरणाचे पाणी सोडल्यामुळे काल डिचोली तालुक्यातील साळ गावात निर्माण झालेली पूरपरिस्थिती आता नियंत्रणात आली आहे. काल डिचोलीचे मामलेदार प्रवीण पंडीत यांच्या  नेतृत्वाखाली रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आले. एकूण 4 कुटुंबातील 25 जणांना सरकारी यंत्रणेने सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. बऱ्याच जणांनी भीतीने स्वतःचं घर सोडून सुरक्षित ठिकाणी आसरा घेतला होता. विधानसभा सभापती राजेश पाटणेकर यांनी रात्री साळ गावात धाव घेऊन बचाव पथकाला लोकांना आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले होते. आज परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती मामलेदार पंडीत यांनी दिली आहे. काल रात्री उशिरा दृष्टीचे जीवरक्षक साळ गावात दाखल झाले असून त्यांचीही मदत घेतली जात आहे.

कुळे परिसरातील 6 प्राथमिक शाळा आणि 2 हायस्कूल आणि 4 अंगणवाड्यांना आज सुट्टी देण्यात आल्याची माहिती सरपंच मणी लांबोर यांनी दिली आहे.

सलग आठव्या दिवशीही गोव्यात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी अनेक ठिकाणी पुरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे.  पावसाचा सगळ्यात जास्त फटका डिचोली आणि सत्तरी तालुक्याला बसला आहे. डिचोली आणि सत्तरी तालुक्यातील नद्यांना पूर आला असून काठावरील लोकांसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे.



सोमवारी रात्री बागवाडा-पीळगाव येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या 10 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली होती.  मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आमोणा आणि साखळी येथील पुरग्रस्त भागाची पाहणी करून अधिकाऱ्यांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत. साखळी बाजारपेठेत शिरलेले पाणी पंप लावून पुन्हा नदीत सोडले जात आहे.

सत्तरी तालुक्यात अनेक रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे काही गावांचा संपर्क तुटला आहे. परवा उसगाव येथील नेस्ले कंपनी जवळ खांडेपार नदीला आलेल्या पुरात अडकलेल्या 15 कुटुंबियांना अग्निशामक दलच्या जवानांनी बोटी मधून  बाहेर काढून सुरक्षितस्थळी हलवले आहे. म्हापसा-गिरी येथे राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली गेला होता. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक मंदावली होती.  आपत्कालीन यंत्रणा सज्ज असून अनेक ठिकाणी मदत कार्य सुरु करण्यात आले आहे.