नवी दिल्ली:  रेल्वेचा विशेष सुरक्षा निधी देण्याबाबतचा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाने नाकारल्यामुळे तिकीट दरवाढीच्या रुपाने प्रवाशांवर हा बोजा टाकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण दुसरीकडे रेल्वे विभागाने शताब्दी, राजधानी आणि दुरान्तो सारख्या लांब पल्ल्याच्या रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा देण्याच्या तयारीत आहे.


कारण, रेल्वे विभागाने आपल्या फ्लॅक्सी फेअरच्या रचनेत बदल करण्याचे ठरवले आहे. या नव्या बदलामुळे शताब्दी, राजधानी आणि दुरान्तोसारख्या लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस ट्रेनने प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

फ्लॅक्सी फेअर म्हणजे काय?

रेल्वे विभागाने तिकीट बुकींगमध्ये काही महिन्यांपूर्वी शताब्दी, राजधानी आणि दुरान्तोसारख्या प्रीमिअम ट्रेनसाठी फ्लॅक्सी फेअर दरांची घोषणा केली. या अंतर्गत राजधानी, शताब्दी आणि दुरान्तोचे रेल्वे तिकीट जसजसे आरक्षित होत जाईल, तसतसे त्या ट्रेनच्या तिकीटांचा दर वाढवले जातात. ही तिकीट दर वाढवण्याची मर्यादा पूर्वी 50 टक्केपर्यंत होती. पण त्यामध्ये कपात करुन ती आता 40 टक्के करण्याची शक्यता आहे.

यामुळे ट्रेन रेल्वे स्थानकातून निघण्यापूर्वी काही तास आधी तिकीट आरक्षित करणाऱ्या प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. यासंबंधीचा अध्यादेश लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.