Women Army Officers into Artillery Regiments: देशाच्या कन्या आता तोफ आणि रॉकेटने शत्रूंना चोख प्रत्युत्तर देण्यास सज्ज झाल्या आहेत. भारतीय लष्कराने प्रथमच आपल्या तोफखाना पलटणीत (Artillery Regiment) पाच महिला अधिकाऱ्यांचा समावेश केला आहे. रेजिमेंट ऑफ आर्टिलरीमध्ये सामील झालेल्या महिला अधिकाऱ्यांनी शनिवारी चेन्नईतील ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी (OTA) मध्ये यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण केले.


लेफ्टनंट मेहक सैनी, साक्षी दुबे, अदिती यादव आणि पायस मौदगील यांच्यासह पाच महिला अधिकाऱ्यांचा आर्टिलरी रेजिमेंटमध्ये समावेश करण्यात आला आहे. पाच महिला अधिकार्‍यांपैकी तीन चीनच्या सीमेवरील सैन्यात तैनात आहेत, तर इतर दोन महिला अधिकारी पाकिस्तानला लागून असलेल्या सीमेवर आव्हानात्मक ठिकाणावर तैनात आहेत.


लेफ्टनंट मेहक सैनी यांना देखरेख आणि लक्ष्य संपादन रेजिमेंटमध्ये, तर लेफ्टनंट साक्षी दुबे आणि लेफ्टनंट अदिती यादव यांना फील्ड रेजिमेंटमध्ये तैनात केले आहे. लेफ्टनंट पवित्रा मौदगील यांना मध्यम रेजिमेंटमध्ये आणि लेफ्टनंट आकांक्षा यांना रॉकेट रेजिमेंटमध्ये नियुक्त करण्यात आले आहे. पासिंग आऊट परेडच्या समारोपानंतर महिला अधिकाऱ्यांनी संविधानाप्रती निष्ठेची शपथ घेतली आणि त्यांना पदचिन्ह प्रदान केले गेले. हे त्यांच्या आर्टिलरी रेजिमेंटमध्ये प्रवेशाचे प्रतीक होते.


महिलांनो, स्वतःवर विश्वास ठेवा, तुम्ही जे करू इच्छिता ते कराच


गलवान खोऱ्यातील संघर्षाचे नायक दीपक सिंह यांच्या पत्नी लेफ्टनंट रेखा सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्या म्हणाल्या, माझ्या पतीच्या मृत्यूनंतर मी भारतीय सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी तयारी सुरू केली. आज माझे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे आणि मी लेफ्टनंट झाली आहे. मला खूप अभिमान वाटतो आणि मी सर्व महिला उमेदवारांना सल्ला देऊ इच्छिते की, त्यांनी स्वतःवर विश्वास ठेवावा आणि इतरांचा विचार न करता त्यांना जे करायचे आहे ते करावे. गलवान संघर्षात दीपक सिंह यांनी सर्वोच्च बलिदान दिले.


बदलाचा परिणाम


आर्टिलरी रेजिमेंटमध्ये महिला अधिकार्‍यांचे कमिशनिंग हे भारतीय सैन्यात चालू असलेल्या परिवर्तनाची साक्ष आहे, असे लेफ्टनंट जनरल अदोष कुमार यांनी म्हटले. गेल्या जानेवारीत लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी तोफखाना युनिटमध्ये महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय जाहीर केला होता. नंतर हा प्रस्ताव शासनाने मंजूर केला.


महिलांवर केला अभिमान व्यक्त


महिला अधिकाऱ्यांबद्दल अभिमान व्यक्त करताना लेफ्टनंट जनरल अदोष कुमार म्हणाले, "आमच्यासोबत महिला अधिकाऱ्यांचे स्वागत करणे हा रेजिमेंट आर्टिलरीसाठी एक महत्त्वाचा प्रसंग आहे. आमचा त्यांच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे आणि आम्हाला खात्री आहे की, ते कमांड आर्टिलरी युनिटसह त्यांच्या संबंधित भविष्यातील कारकीर्दीत चांगली कामगिरी करतील."


या समारंभाला लेफ्टनंट जनरल आणि तोफखाना महासंचालक (नियुक्त), इतर मान्यवर आणि नव्याने नियुक्त झालेल्या अधिकार्‍यांचे कुटुंबीय यांच्यासह वरिष्ठ लष्करी अधिकारी उपस्थित होते. OTA चेन्नई येथे झालेल्या पासिंग आऊट परेडमध्ये 186 उमेदवार सहभागी झाले होते. यापैकी 29 उमेदवार हे भूतानचे नागरिक आहेत. बांगलादेशचे लष्कर प्रमुख सीओएएस जनरल एसएम शफीउद्दीन अहमद यांनी पासिंग आऊट परेडचा आढावा घेतला.


महत्त्वाच्या बातम्या:


Pune Traffic News: वाहतूक कोंडीत पुणे जगात सहाव्या क्रमांकावर; 10 किमी प्रवासासाठी किती वेळ लागतो?