जयपूर : राजस्थानमध्ये झालेल्या कार अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. लग्नाहून परतताना चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानंतर हा अपघात घडला.

गोयल कुटुंबातील तीन महिला आणि दोन चिमुरड्यांचा या अपघातात मृत्यू झाला. सादुल शहरातील नवीन कुमार गोयल विवाहित बहीण रितू आणि तिची मुलगी मारिया यांना सोडण्यासाठी अबोहरला चालला होता. त्यावेळी वाटेत हा अपघात घडला.

बठिंडाजवळ पहाटे पाच वाजता एका प्राण्याला वाचवण्याच्या नादात नवीन यांचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे गाडी एका ऑईल टँकरला धडकून हा भीषण अपघात घडला.

अपघातात नवीन यांची बहिण रितू, तिची मुलगी मारिया, नवीन यांची आई निर्मला, पत्नी गरिमा आणि मुलगा गणेश यांचा मृत्यू झाला. नवीन आणि गरिमा यांची दुसरी मुलगी आलिना गंभीर जखमी झाली आहे.