नवी दिल्ली : उत्तर प्रदेश निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या रिता बहुगुणा-जोशी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. 'एबीपी न्यूज'च्या सुत्रांनी ही माहिती दिली असून अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

उत्तर प्रदेशच्या लखनऊ कान्टमधून रिता बहुगुणा-जोशी आमदार आहेत. त्यांनी 2007 ते 2012 या कालावधीत उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीचं अध्यक्षपदही भूषवलं होतं. यूपीच्या माजी मुख्यमंत्री हेमवती नंदन बहुगुणा यांच्या त्या कन्या.

मे महिन्यातही बहुगुणा समाजवादी पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. अखिलेश यादव यांची भेट त्यांनी घेतल्यामुळे या वावड्या उठल्या, मात्र त्यांनी लेखी स्पष्टीकरण देत या शक्यता नाकारल्या होत्या.

रिता बहुगुणा या 1995 ते 2000 या काळात समाजवादी पक्षाकडून अलाहाबादच्या महापौरपदी होत्या. त्यानंतर सपाच्या तिकीटावरच त्यांनी सुलतानपूरमधून खासदारकीची निवडणूक लढवली होती.

2012 मध्ये त्या लखनऊ कॅन्टोन्मेंटमधून काँग्रेसतर्फे आमदारपदी निवडून आल्या. 2014 मध्ये त्या लोकसभेला उभ्या राहिल्या होत्या, मात्र पराभूत झाल्या. लोकसभेला त्यांना दोन वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे.