श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे 5 जवान शहीद झाले आहेत, तर 2 जवान जखमी आहेत. अनंतनागमधील एका बस स्थानकावर हा हल्ला झाला. जवानांनी एका दहशतावाद्याचा खात्मा केला आहे.
या हल्ल्याची जबाबदारी अल उमर मुजाहिद्दीनने घेतली आहे. मात्र जैश-ए-मोहम्मदने हा हल्ला केल्याचा अंदाज सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केला आहे. एका दुचाकीवर आलेल्या दहशतवाद्यांनी बी 116 या बटलियनवर आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या गस्तीवर असलेल्या पथकावर हल्ला केला. या हल्ल्यात एका जवानाचा जागीच मृत्यू झाला होता.
केपी रोड परिसरात सीआरपीएफचे जवान आणि राज्य पोलीस यांची संयुक्त टीम ड्युटीवर तैनात होते. दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर जवानांनाही देखील चोख प्रत्युत्तर दिलं, त्यामध्ये एका दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं. तर दुसरा दहशतवादी पसार झाला. विशेष म्हणजे केपी रोड परिसरात दहशतवादी हल्ला होणार असल्याची माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी सुरक्षा यंत्रणांना दिली होती.
अमरनाथ यात्रेची तयारी सुरु असताना हा हल्ला झाल्याने परिसरात दहशतीचं वातावरण आहे. अमरनाथ यात्रा 1 जुलैपासून सुरु होत असून 15 ऑगस्टला समाप्त होत आहे.