मुंबई : ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचे कॅनडातील टोरंटो येथे निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. ते दीर्घ आजारानं ग्रस्त असल्याने बऱ्याच दिवसांपासून त्यांच्यावर कॅनडात उपचार सुरु होते. कादर खान यांचा मुलगा सरफराज याने ही माहिती दिली. मागील  16-17 दिवसांपासून त्यांच्यावर कॅनडातील एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. त्यांना कॅनडाची नागरिकता मिळाली होती. 2015-16 साली ते कॅनडामध्ये स्थायिक झाले होते. तिथेच्या त्यांच्या पार्थिव देहावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.

कादर खान यांच्या निधनाची बातमी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर वायरल होत होती.  मागील काही दिवसांपासून कादर खान यांची प्रकृती नाजूक असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ऑल इंडिया रेडीओने आपल्या ट्विटरवर त्यांचं निधन झालं असल्याचं ट्वीट केल्याने कादर खान यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली होती.

यापूर्वीही अनेक वेळा कादर खान यांच्या निधनाची अफवा सोशल मीडियावर पसरली होती. पुन्हा  या गोष्टीची पुनरावृती झाल्याने संताप व्यक्त केला जात होता.

प्रोग्रेसिव सुप्रान्यूक्लियर पाल्सी डिसऑर्डर या आजारामुळे 81 वर्षीय कादर खान यांचा मेंदूने काम करणं बंद केलं होतं.  गेल्या वर्षी कादर खान यांच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया करण्यात आली होती, त्यामुळे त्यांना चालणेही कठीण झाले होते. चालल्यास आपण खाली पडू याची भीती कादर खान यांना वाटत होती. त्यानंतर सातत्यानं त्यांची प्रकृती खालावत गेली होती. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

कादर खान यांची कारकिर्द

कादर खान यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1937 रोजी काबूलमध्ये झाला होता. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची, नाट्यलेखनाची आवड होती. 1973 मध्ये 'दाग' चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.  चार दशकांमध्ये 300हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी कामं केली. त्यांचं विनोदाचं टायमिंग अफलातून होतं. कादर खान यांना तीन वेळा फिल्मफेअर तर 2013 मध्ये त्यांना साहित्य शिरोमणी पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.