Firozabad Fire: तुम्ही घरात इन्व्हर्टर वापर करताय का? इन्व्हर्टर वापरणाऱ्यांना सतर्क करणारी ही बातमी. फिरोजाबादची घटना  इन्व्हर्टरमुळं घरात लागलेल्या भीषण आगीत तब्बल सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर तीनजण गंभीर जखमी आहेत. घरात लावलेल्या इन्व्हर्टरमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दरम्यान, ही दुर्दैवी घटना उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमध्ये (Firozabad) घडली आहे. 


फिरोजाबादच्या जसराना भागात मंगळवारी एका घराला भीषण आग लागली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. याशिवाय पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारीही उपस्थित आहेत. आगीमुळे एकाच कुटुंबातील नऊपैकी सहा जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये तीन मुलं, दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे, अशी माहिती एसएसपी आशिष तिवारी यांनी दिली आहे. 


दुर्दैवी घटनेसंदर्भात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच, जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहे. याशिवाय मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे.


जसराना परिसरातील पाढम शहरात शॉर्टसर्किटमुळे एका घराला भीषण आग लागली. घराला आग लागल्यानं शहरात एकच खळबळ उडाली होती. आगीची माहिती मिळताच काही अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. पोलीस आणि प्रशासकीय अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, रमन कुमार यांचे इलेक्ट्रॉनिक्स आणि फर्निचरचे दुकान आहे. दुकानाच्या वरच त्यांचं कुटुंब राहत होतं. मंगळवारी संध्याकाळी अचानक त्यांच्या घराला आग लागली. आग फारच भीषण होती. लोकांनी पोलीस आणि अग्निशमन दलाला आगीची माहिती दिली. माहिती मिळताच एसपी देहाट रणविजय सिंह, एसडीएम पारसनाथ मौर्य, सीओ अनुज कुमार यांच्यासह पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. 


फिरोजाबादमधील घटनेची माहितीसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयानं ट्वीट केलं आहे. ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी फिरोजाबाद जिल्ह्यातील जसराना येथील एका दुकानाला लागलेल्या आग दुर्घटनेत होरपळून मृत्यू झालेल्यांबद्दल ट्वीट केलं आहे. तसेच, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करुन त्यांच्यावर योग्य उपचार करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यासोबतच वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊन मदतकार्य युद्धपातळीवर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Mumbai-Pune Expressway Accident: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर तीन ट्रकचा अपघात; एक ट्रक 100 फूट दरीत कोसळला