Mumbai-Pune Expressway Accident: 'मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे'वर (Mumbai-Pune Expressway) वाहनांचा भीषण अपघात झाला आहे. तीन ट्रकनी एकमेकांना धडक दिली असून धडकेत एक ट्रक दरीत कोसळल्याची माहिती मिळत आहे. तर दरीत कोसळलेल्या ट्रकच्या कॅबिनमधून अडकलेल्या चालकाला सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं आहे. दरम्यान, या भीषण अपघातात अद्याप कोणतीही जीवीतहानी झाल्याची कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. 


आज (बुधवारी) पहाटेच्या सुमारास मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावरील बोरघाटात भीषण अपघात झाला. तीन वाहनांती एकमेंकांना धडक दिल्यानं हा अपघात झाला. या अपघातात मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर तीन वाहनांनी एकमेकांना धडक दिल्यानं कंटेनर ट्रक सुमारे शंभर फूट खोल दरीत कोसळला. तसेच, आणखी एका ट्रकची कॅबिनही दरीत कोसळली.  पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. 


मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पहाटेच्या सुमारास मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या मार्गावरील ढेकू गावाजवळ तीन वाहनांनी एकमेकांना जोरदार धडक दिली. एक्सप्रेसवेवरील बोरघाटात तीन ट्रकनी एकमेंकांना धडक दिली. यानंतर त्यापैकी एक ट्रेलर 100 फूट खोल दरीत कोसळला. तर दुसऱ्या ट्रकची केबिन या ट्रेलरपाठोपाठ दरीत कोसळली. तर तिसरा ट्रक रस्त्यात पलटी झाला. 


पाहा व्हिडीओ : मुंबई-पुणे महामार्गावर अपघात, ट्रक थेट दरीत कोसळला



दरम्यान, मुंबईकडे येणाऱ्या मार्गावरील उतारावर हा अपघात झाला असून दरीत कोसळलेल्या कंटेनर ट्रकमधील चालकाला बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर, दरीत कोसळलेल्या ट्रकच्या केबिनमधील चालकाला सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धावणाऱ्या संघटनेच्या सदस्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर बचावकार्य सुरु करण्यात आलं. अपघातात जखमी झालेल्यांना तात्काळ उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं. तर, या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे. मात्र, अद्याप यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. तर, पहाटे झालेल्या अपघातामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.