दिल्ली : राजधानी दिल्लीतील बवाना औद्योगिक वसाहतीत तीन कारखान्यांमध्ये भीषण आग लागली आहे. कपड्याचा कारखाना, फटाक्याचा कारखाना आणि प्लॅस्टिक कारखान्याला लागलेल्या आगीत आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. 12 अग्निशमन दलाच्या गाड्यांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं.
अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत 9 मृतदेह बाहेर काढले असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. अजूनही शोधमोहिम सुरु असून कूलिंग ऑपरेशन सुरु असल्याचं सांगण्यात आलं आहे.
या घटनेत 13 जण पहिल्या मजल्यावर, 3 तळमजल्यावर आणि एकाचा मृत्यू बेसमेंटला झाल्याची माहिती आहे. आग लागल्यानंतर अनेकांनी जीव वाचवण्यासाठी तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारल्याचंही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.
आग एवढी भीषण होती, की कर्मचाऱ्यांना बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा गुदमरुन मृत्यू झाला. आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. आज सायंकाळी सेक्टर 5 मधील फटाक्याच्या कारखान्याला आग लागली होती. मात्र त्यानंतर ही आग मोठ्या प्रमाणात पसरल्याचं बोललं जात आहे.