नवी दिल्ली: उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.निवडणुकीच्या तारखा जसजशा जवळ येत आहेत, तसतसे सर्वच राजकीय पक्षांच्या हलचाली आणि उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. काहीजण तिकीट न मिळाल्याने नाराज आहेत. तर अनेकजण तिकिटासाठी नेत्यांजवळ लॉबिंग करत आहे. अशातच एक रंजक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशची निवडणूक जिंकण्यासाठी एका उमेदवाराने चक्क गाढवावरुन आपली वरात काढून उमेदवारी अर्ज दाखल केला.


द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, नोएडामधील 35 वर्षीय देवराम प्रजापती यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी स्वत: ची चक्क गाढवावरुन वरात काढली. पण ही वरात त्यांच्या चांगल्याच अंगलट आली आहे. कारण मंगळवारी त्यांच्याविरोधात उत्तर प्रदेश पोलिसांनी 'प्रीव्हेंशन ऑफ अॅनिमल क्रुअॅलिटी अॅक्ट'अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

प्रजापती आगामी उत्तर प्रदेशची निवडणूक अपक्ष म्हणून लढत असून, सोमवारी त्यांनी गाढवावरुन वरात काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना, ''आमचे पुर्वज गाढवांची देखभाल करत. गाढव हा त्यांच्या उदरनिर्वाहाचा एक भाग होता. गाढवांनी आमच्यासाठी ओझी वाहीली. त्यामुळे त्यांच्याशी आम्ही कधीही चुकीची वागणूक दिली नाही.'' असं सांगितलं.

दरम्यान, त्यांनी गाढवावरुनच लोकसभेपर्यंतचा प्रवास पूर्ण करणार असून, याद्वारे आपल्या समाजाच्या दुरावस्थेकडे सरकारचे लक्ष वेधणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.