पाटणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात कुणी आवाज उठवला तर त्याचा हात तोडून टाकू, असं वादग्रस्त वक्तव्य बिहार भाजपचे प्रदेशाध्यक्ष नित्यानंद राय यांनी केलं आहे. पाटणा इथे आयोजित ओबीसी समाजाच्या एका कार्यक्रमात नित्यानंद राय बोलत होते.


नित्यानंद राय हात तोडण्याची भाषा करत असताना बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदीही व्यासपीठावर उपस्थित होते. राय हे बिहारचे भाजप प्रदेशाध्यक्षासोबतच उजियारपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदारही आहेत.

"पंतप्रधान नरेंद्र मोदी कठीण परिस्थितीत देशाचं नेतृत्त्व करत आहेत. ही आपल्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. जर त्यांच्याविरोधात कोणी बोट दाखवेल किंवा हात उगारेल, तर त्याचा हात तोडला किंवा कापला जाईल," असं नित्यानंद राय म्हणाले.

या वादग्रस्त विधानावर राजकीय वर्तुळातून टीकेचा भडीमार सुरु झाला. वाद वाढलेला पाहून नित्यानंद राय यांनी सारवासारव केली. राय म्हणाले की, "माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला. हात तोडण्याचं वक्तव्य म्हण म्हणून बोललो. देशाच्या गौरव आणि सुरक्षेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर कठोर पावलं उचलली जातील, असं माझ्या बोलण्याचा अर्थ होता."