नवी दिल्ली : अरविंद केजरीवाल सरकारने दिल्लीत कोरोना विषाणूच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर एक मोठा निर्णय घेतला आहे. आता दिल्लीत मास्क न घालणाऱ्यांना 2000 रुपयांपर्यंत दंड आकारला जाणार आहे. पूर्वी हा दंड 500 रुपये होता, तो आता चौपट वाढविण्यात आला आहे.


दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज जाहीर केले की एलजीची भेट घेऊन हा निर्णय घेण्यात आला असून आज बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत हे पाऊल उचलण्याचा निर्णय घेण्यात आला. राजधानी दिल्लीत वाढत्या कोरोना प्रकरणांना सामोरे जाण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलविली ज्यामध्ये भाजप आणि काँग्रेसनेही भाग घेतला.


बुधवारी 131 लोकांच्या मृत्यूची नोंद


बुधवारी दिल्लीत 7 हजार 486 नवीन कोरोना संक्रमीत रुग्णांची नोद झाली. परिणामी राजधानीत कोरोना लागण झालेली एकूण संख्या 5 लाखांवर गेली आहे. तर, बुधवारी या साथीने 131 लोकांचा मृत्यू झाला. कोरोना संक्रमणामुळे दिल्लीत एका दिवसात सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली.


एका आठवड्यात 715 मृत्यू


गेल्या एका आठवड्यात राजधानीत कोरोना संसर्गाची प्रकरणे पाहिली तर 12 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबर या कालावधीत येथे 43 हजार 109 नवीन प्रकरणे आली आहेत, तर या काळात 715 लोक मरण पावले आहेत.


केंद्र सरकारही लक्ष ठेवून


रविवारी गृहमंत्री अमित शहा यांनीही बैठक घेऊन दिल्लीच्या कोरोनातील परिस्थितीचा आढावा घेतला आणि दिल्ली सरकारला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. या व्यतिरिक्त कोविड 19 च्या लढ्यात कोरोना वॉरियर्सला मदत करण्यासाठी निमलष्करी दलाचे डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारीही दिल्लीत पोहचले आहे.


राज्यात दिवाळीनंतर पुन्हा कोरोना संख्येत वाढ, काल दिवसभरात 5 हजार नव्या कोरोनारुग्णांची नोंद