नवी दिल्ली : एअर इंडियाचा महाराजा आता विक्रीला निघणार असल्याचे संकेत अर्थमंत्री अरूण जेटली यांनी दिले आहेत. केंद्र सरकारच्या तीन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त दूरदर्शनला दिलेल्या मुलाखतीत अर्थमंत्र्यांनी हे संकेत दिले आहेत.
अरुण जेटली म्हणाले की, सुयोग्य गुंतवणूकदार मिळाल्यास सरकारने 'एअर इंडिया'मधून पूर्णपणे अंग काढून घ्यावे, या मताशी सरकार अनुकूल आहे.
तसेच सध्या देशातील हवाई वाहतूक बाजारपेठेतील 84 टक्के कार्यभाग खासगी विमान कंपन्या चालवतात, तर त्याच कंपन्या शंभर टक्के कार्यभाग का चालवू शकत नाहीत, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
अरुण जेटली यांच्या या वक्तव्यामुळे एअर इंडियासह हवाई वाहतूक क्षेत्रातही खळबळ उडाली आहे. सध्या 'एअर इंडिया'चा बाजारपेठेतील हिस्सा अत्यंत कमी आहे. त्यातच कंपनीवर 50 हजार कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर असल्याने सरकार ही कंपनी विकणार असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, जेटली यांनी प्रवासी संख्येच्या हिश्शाचे जे गृहितक एअर इंडियाची स्थिती सांगण्यासाठी वापरलं आहे, ते चुकीचं आहे. असा आक्षेप एअर इंडियातील अधिकाऱ्यांनी घेतला आहे.